उच्च कोटीचे साधक असलेले शुक्राचार्य यांनी असुरी शक्तींना पाठबळ दिले होते, त्याच पद्धतीने चार पिठाचे शंकराचार्यही श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना मुहूर्तला विरोध करून श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्या असुरी शक्तींना पाठबळ देत आहेत, असा दावा हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांनी शनिवारी येथे केला. अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकाम अपूर्ण आहे व या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्तही योग्य नाही असा दावा चार पिठाच्या शंकराचार्यांनी केला आहे.
परंतु शंकराचार्यांच्या या भूमिकेचा हिंदुराष्ट्र सेनेचे देसाई यांनी निषेध केला असून त्यावर वक्तव्य केले आहे. असूरी शक्तिला साथ देणाऱ्या शुक्राचार्यांसारखे शंकराचार्य आता वागत आहेत. त्यांचे बोलवते धनी कम्युनिस्ट व काँग्रेस आहेत. स्वतःच्या अहंकाराचे तूष्टीकरण करण्यासाठी शंकराचार्य असे बोलत असल्याने आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक श्रेय घेऊ शकतो तर मोदींनी का घेऊ नये?
नवी स्मशानभूमी बांधली व शौचालय बांधले तरी साधा नगरसेवक त्याचे श्रेय घेतो, अशावेळी अयोध्ये मध्ये श्रीराम मंदिर उभारण्यासाठी कृतीशील प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा राजकीय लाभ घेतला तर वावगे काय? असा सवाल करून देसाई म्हणाले, 22 जानेवारीची श्रीराम प्रतिष्ठापना म्हणजे एका मंदिराचा नव्हे तर भारत देशाचा जीर्णोद्धार आहे.
अध्यात्म हे भारतीयत्वाचे प्रतीक आहे, दुधात जसे तूप असते तसे प्रत्येकात राम आहे. शंकराचार्यांनी मुहूर्ताला विरोध केल्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. पण त्याकडे दुर्लक्ष करून सर्व भारतीयांनी 22 जानेवारीचा आनंदोत्सव उत्सव साजरा करा असे देसाई म्हणाले.
काहींना पोटशूळ उठला
राम मंदिर होत असल्याने काहींना पोटशूळ उठला आहे. मंदिर अर्धवट आहे, असा त्यांचा तर्क आहे. मात्र, पूर्वी भारत देश अफगाणिस्तानापासून बांगलादेशापर्यंत होता, तो खंडित झाला व त्याच भारतात आपण राहत आहोत, असे स्पष्ट करून देसाई म्हणाले, ज्यांचे पांडित्य जगाने मान्य केले अशा गणेश शास्त्री द्रविड यांनी रामप्रतिष्ठापनेचा मुहूर्त काढला आहे. सोमवारी सर्वांनी विरक्तीचे प्रतिक असलेला भगव्या ध्वजाची गुढी उभारावी, घराला तोरणे बांधावीत असे आवाहन देसाई यांनी यावेळी केले होते.
भारतीय समाज शंकराचार्यांनी नाही तर संत महात्मे, वारकरी, नाथ संप्रदाय यांनी उभा केला आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. दरम्यान, रामाच्या राज्याभिषेकाला शूरपणखा वा पूतना यांनी येणे अपेक्षित नाही. सोनिया गांधी यांचे रक्त व संस्कार भारतीय नाहीत, त्यामुळे त्यांनी आयोध्येला येण्यास नकार दिला यात वावगे काही नाही, असे भाष्यही देसाई यांनी केले.यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे, माजी नगरसेवक संग्राम शेळके, अविनाश सरोदे, नंदकिशोर सरोदे, आकाश वाबळे, सोलापूरचे रवी गोणे, आनन्द मुसळे आदी उपस्थित होते.