अहमदनगर बातम्या

पुण्यातील सभेत शाहांचा घणाघात, शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते !

Published by
Ahmednagarlive24 Office

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार, तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आहेत. ते सध्या औरंगजेब फॅन क्लबचे नेते झाल्याने त्यांचे कधीही भले होणार नाही,

अशी घणाघाती टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत येणार आहे, हे मला स्पष्ट दिसत असल्याचे सांगत मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे अधिवेशन पुण्यातील बालेवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार पंकजा मुंडे उपस्थित होते.

अमित शाह म्हणाले की, महायुती सरकारने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील महिलांना होणार आहे तर काँगेसने गरीबांसाठी काय केले? काँग्रेसच्या आश्वासनांचे काय झाले ? काँग्रेस महिलांना कधी मदत देणार आहे? असे सवाल उपस्थित करत विरोधकांकडून फक्त खोटा प्रचार केला जात आहे.

याबाबत आज मी अनेक कार्यकर्त्यांशी बोललो. पण, बरेच कार्यकर्ते संभ्रमात दिसत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार बनवायचे आहे की नाही? असा थेट सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला आणि महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत आणण्याचे आवाहन केले.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अमित शाह यांनी जोरदार टीका केली. शाह म्हणाले की, आम्ही कलम ३७० हटवून दाखवले. भारतीय जनता पक्ष हा विचारधारेवर चालतो. आम्ही जी वचने दिली ती पूर्ण केली आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे.

परंतु, ज्याला केवळ ३० टक्के मार्क मिळाले, तो अहंकारी बनला आहे, असे म्हणत लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे तीन निवडणुकांत पराभूत झाल्यानंतरही राहुल गांधी यांचा अहंकार प्रचंड वाढला आहे.

विधानसभेत कसर भरून काढा

आपण जिंकूनही निराश असल्यासारखे वाटतेय आणि दुसरीकडे पराभवानंतरही राहुल गांधी अहंकारी झालेत. भाजपला २४० आणि एनडीएला ३०० जागा मिळाल्या आहेत. हे लक्षात ठेवा. निवडणुकीत लोकांनी मोदींच्या दहा वर्षांच्या कामकाजावर मोहोर उमटवली.

तरी देखील बहुमत मिळाले नाही, याची खंत वाटतेय, पण डोके धरून बसू नका. आता विधानसभेत सगळी कसर भरून काढा. हताश होऊ नका. लोकसभेतील मोठा विजय आहे. महाराष्ट्रातही २०२४ मध्ये सर्वांत मोठा विजय होणार आहे, असा दावा अमित शाहांनी यांनी यावेळी केला.

गैरसमज करून घेण्याची गरज नाही

भाजप पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये थोडेसे कन्फ्युजन होताना दिसून येत आहे, परंतु कसलाही गैरसमज करून घेण्याची गरज नाही. त्यासाठी एक उदाहरण देतो, दोन मुले आहेत. एकाच वर्गात शिकत होते. एक ८० टक्के घेऊन वर्गात नंबर एकवर येत होता, तर दुसऱ्या वेळेस त्याने ९० टक्के घेण्याचा संकल्प केला.

जो दुसरा विद्यार्थी होता तो चार वर्षांत त्याच वर्गात होता, त्याला २० मार्क पडायचे, यावेळी त्याने २५माकांची अपेक्षा ठेवली होती. निकाल आला तेव्हा ८० टक्केवाल्या विद्यार्थ्याला ७५ मार्क मिळाले आणि २० वाल्याला २५ मार्क मिळाले. असाच प्रकार आपल्या बाबतीत घडला आहे. आस्सेदेखील शहा म्हणाले.

अमित शाहांची पवारांवरील टीका ही हास्यास्पद आहे. ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले ते अशोक चव्हाण हे तर आज मंचावर शाहांच्या मागे बसले होते. देवेंद्र फडणवीस यांनी तर ‘चक्की पिसिंग’ ही लाईन धरली होती, त्याचे काय झाले. आरएसएसने कृषी मंत्रालयाबाबत ११८ कोटींचे आरोप केले, त्यावर तुम्ही काहीच का बोलत नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांना केला.

Ahmednagarlive24 Office