Ahilyanagar News:- शिर्डी विधानसभा मतदार संघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ समजला जातो व या ठिकाणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रभावती घोगरे यांच्यामध्ये या निवडणुकीत लढत होताना दिसून येत आहे.
जर आपण मागील काही वर्षांचा इतिहास बघितला तर या मतदारसंघावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे व हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला समजला जातो.
यावेळेस देखील ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत व मोठ्या प्रमाणावर प्रचार सभांचे आयोजन तसेच कॉर्नर सभा व नागरिकांशी भेटीसाठी यावर विखे पाटील यांनी भर दिल्याचे दिसून येत आहे. अगदी याच प्रकारे त्यांनी केलवड येथे महायुतीच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली होती व त्या ठिकाणी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
निळवंडेच्या पाणी प्रश्नावरून विरोधकांकडून आमची बदनामी- विखे पाटील
केलवड येथे माहितीच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आलेले होते व या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना विरोधकांवर अनेक मुद्द्यांना धरून जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की आम्ही जे बोलतो तेच करतो.
निळवंडे पाण्याच्या बाबतीत सुद्धा पाणी आणण्याचा दिलेला शब्द मी पूर्ण करून दाखवला व या प्रश्नावर केवळ आमची बदनामी केली गेली असे देखील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. महाविकास आघाडी सरकारने राज्याला किंवा जिल्ह्याला काय दिले? भविष्यामध्ये काय करणार? हे प्रामुख्याने सांगायला पाहिजे होते.
परंतु केवळ व्यक्तीद्वेषातून जनतेच्या बुद्धिभेद करायचा हा त्यांचा प्रयत्न होता. जिल्ह्याच्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारचे योगदान नसलेल्या शरद पवार यांनी पाण्याच्या बाबतीतही या जिल्ह्याचे नुकसान केले असा थेट आरोप त्यांनी यावेळी भाषणात केला. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, अडीच वर्षांपूर्वी या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते.
परंतु जनतेच्या हिताचा कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नाही. परंतु सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये महायुतीच्या सरकारने मात्र अनेक जनतेच्या हिताचे निर्णय करून सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेची खऱ्या अर्थाने कृती केली.
आज महाविकास आघाडीचा एकही नेता विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही. लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी खोटा प्रचार आणि फसवणूक करून यश मिळवले.
परंतु या निवडणुकीच्या वेळी मात्र जनतेच्या लक्षात या सगळ्या गोष्टी आल्या असून महायुतीला जनतेचे पाठबळ यावेळी मिळणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना आता महायुती सरकारची भक्कम साथ मिळाली असून पिक विमा योजने सोबतच आता सरकार आल्यानंतर कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.