कोरोना संकटात संपूर्ण जग भितीच्या छायेखाली असताना आपल्या जीवाची पर्वा न करता तीस हजारांहून अधिक कोरोना रूग्णांच्या माध्यमातून मानवतेची सेवा करणाऱ्या नीलेश लंके यांना संसदेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदे येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत पवार हे बोलत होते.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आ. रोहित पवार, पै. चंद्रहार पाटील, संतोष वेताळ, अंकुश काकडे, मा. आ. राहुल जगताप, राजेंद्र फाळके, जयंत वाघ, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, साजन पाचपुते, अनिल ठवाळ यांच्यासह मोठा जनसमुदाय सभेसाठी उपस्थित होता.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, कोरोना संकटात सगळया जगाला स्वतःच्या जीवाची भिती होती. लोक एकमेकांच्या जवळ जात नव्हते. हॉस्पिटलमध्ये जात नव्हते. आपले उमेदवार नीलेश लंके यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रूग्णांची सेवा केली. कोव्हीड सेंंटरमध्ये वास्तव्य केले.
स्वतच्या घरी गेले नाहीत. कोरोना रूग्णांसोबतच खाणे पिणे केले. एवढी माणूसकी क्वचितच पहायला मिळते. त्या नीलेश लंके यांना या एकाच कामासाठी, त्यांनी मानवतेची सेवा केली म्हणून विजयी करणे तुमचे माझे कर्तव्य आहे. हे काम करून श्रीगोंद्याचा नावलौकीक राज्यात करावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच पारनेरसारख्या दुष्काळी तालुक्यातील गरीब कुटूंबातल्या नव्या पिढीतल्या तरूणाला संधी द्या असे आवाहन पवार यांनी केले.
मोदींना शेतकऱ्यांना पैसे मिळू द्यायचे नाहीत
परदेशात साखरेची गरज आहे. साखर निर्यात केली तर उसाला टनामागे तीनशे रूपये जास्त मिळू शकतील. मात्र साखरेची निर्यात केली जात नाही. साखर, कांदा, दुधाची पावडर निर्यात न करता शेतकऱ्याला दोन पैसे मिळू द्यायचे नाही हे धोरण मोदी यांनी स्विकारले असल्याची टीका पवार यांनी केली.
तुमच्या हाती राज्य कशासाठी द्यायचे ?
देशातील १०० पैकी ८७ मुलांना नोकरी मिळत नसल्याचा अहवाल आहे. नोकरी, शेतीमालाच्या भावाचे प्रश्न सुटत नाहीत मग राज्य कशासाठी तुमच्या हातात द्यायचे ? राज्य यांच्या हातात द्यायचे नाही. हा निकाल घ्यावा लागेल असे आवाहन पवार यांनी केले.
लंके यांच्यातील शिवसैनिक जागा
नीलेश लंके यांचे भाषण मी ऐकत होतो. त्यांच्यातील शिवसैनिक आजून जागा असल्याचे भाषण ऐकताना जाणवले. शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही तर कालवा फोडेन अशी भाषा शिवसैनिकच करू शकतो. त्यांच्या धमण्यांमध्ये जे भगवे रक्त आहे, जो विचार आहे तो आजही कायम आहे. असाचा माणूस प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दिल्लीला गेला पाहिजे असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.
लंकेंच्या रूपाने राष्ट्रवादीचा पहिला खासदार !
सुर्य आग ओकतोय, वातावरण तप्त आहे तरीही उपस्थितांमधून वक्त्यांना बोलण्याचा आग्रह होत आहे. याचा अर्थ येथील जनता जागरूक आहे, सावधपणे मतदान करणारी आहे. ज्यावेळी लंके यांचे नाव जाहिर झाले, त्यानंतर या मतदारसंघाची माहीती घेतली आणि आम्ही जाहिर करून टाकले की राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार दिल्लीला गेला. राज्यात ज्या मोजक्या जागा आहेत तिथे प्रचार करण्याची गरजच नाही. त्यातली ही नीलेश लंके यांची जागा असल्याचे संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.
शिवसैनिक लंकेंच्या पाठीशी उभे
नीलेश आमचे तालुकाप्रमुख अत्यंत कडवट शिवसैनिक. आज राष्ट्रवादीत असले तरी सर्व कडवट शिवसैनिक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे राऊत यांनी सांगितले.
विखे यांना कायमचे घरी बसवायचे आहे
तुमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आतापर्यंत किती पक्ष बदलले ? ते शिवसेनेमध्येही होते. काँग्रेसमध्ये होते, त्यांचे चिरंजीव मागील निवडणूकीवेळी राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या तयारीत होते. आता त्यांना आपल्याला घरी पाठवायचे आहे. कायमचे घरी बसवायचे असल्याचे राऊत यांनी सांगितले.
वादळ नव्हे चक्रीवादळ आलंय !
नीलेश लंके हे अत्यंत यशस्वीपणे पुढे नेत आहेत. कुठेही जा त्यांच्या सभांना हजारो लोक उपस्थित असतात. हवा नाही, वादळ नाही तर हे चक्री वादळ असून लंके हे मोठा विजय संपादन करणार आहेत. तरीही शेवटचे मतदान होईपर्यंत प्रत्येकाला काळजी घ्यावी असे आवाहन मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची श्रीगोंदे येथे सभा पार पडली.