अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे साधे राहणीमान आणि साधे घर नेहमीच चर्चेत राहिले आहे. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार हेही लंके यांच्या हंगा येथील घरी आले.
यावेळी आमदार लंके यांच्या आई-वडिलांची पवार यांनी आस्थेने चौकशी केली. राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमानंतर शरद पवार हे अचानक आमदार लंके यांच्या घरी गेले. यावेळी कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी होती. यावेळी आमदार लंके यांनी पुष्पगुच्छ देऊन पवार यांचे स्वागत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. या सोहळ्यानंतर शरद पवार आमदार निलेश लंके यांच्या घरी गेले. निलेश लंके हे नगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत.
कोव्हिड काळात राज्यात सर्वात मोठं कोव्हिड सेंटर उभा करणारे आमदार म्हणून निलेश लंके हे नाव राज्यभर गाजलं होतं. आमदार लंके स्वत: कोव्हिड सेंटरमध्ये राहत होते. आमदार निलेश लंके यांच्या घरी शरद पवारांनी भेट दिली. लोकप्रतिनिधीचे घर म्हटलं तर मोठा बंगला, बंगल्यासमोर नोकरचाकर, अलिशान गाड्या असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.
पण आमदार निलेश लंके यांचं घर अत्यंत साधं आहे. एक रुम, त्यातच छोटं किचन आणि बाजूला बाथरुम अशी निलेश लंके यांच्या घराची रचना. आमदार लंके यांच्या या छोट्या घरात देशातील बडा नेता असलेले शरद पवार यांनी भेट दिल्यामुळे लंके कुटुंबीय भारावून गेलं.
शरद पवार हे लंकेच्या घरी दाखल झाले. त्यांना बसण्यासाठी प्लॅस्टिकची खुर्ची ठेवण्यात आली होती. लाकडी कपाटाला टेकून ही खुर्ची ठेवली. मागच्या भिंतीला गुलाबी रंग होता. गुळगुळीत आणि चकचकीत बंगल्याच्या भिंती जशा असतात तसं चित्र अजिबात नव्हतं.
पवारांच्या बाजूला दोन खुर्च्या ठेवल्या होत्या. तिथे निलेश लंके यांचे आई-वडील बसले होते. अत्यंत साध्या घरात पवार हे गेल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदालाही उधाण आले होते.
पवार यांच्या बाजुला आमदार लंके यांचे आई-वडिल होते. त्यांचीही पवार यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी लंके यांच्या मुलीनेही शरद पवार यांच्याशी संवाद साधला. यावेळी पवार यांनीही लंके यांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाबाबत विचारले.