Shirdi News : शिर्डीत दिंडीत कंटेनर घुसून चौघांचा मृत्यू, उर्वरित अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Published by
Ahmednagarlive24 Office

शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या दिंडीमध्ये कंटेनर शिरल्याने रविवारी (दि.३ डिसेंबर) मोठा अपघात झाला होता. यामध्ये चार वारकरी मृत्यू पावले होते. तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले होते.

आता या आठ अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या तभेटीबाबत मोठी अपडेट आली आहे. अपघातग्रस्त आठही वारकऱ्यांची तब्येत आता स्थिर असल्याची माहिती कुटे हॉस्पिटलने दिली आहे. यातील दोघांना घरी सोडण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. कंटेनरचालक छोटालाल गोपालराम पाल (वय ५०, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विखे-थोरातांसह अधिकारी वर्गाकडून दखल :-अपघाताची घटना कळताच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात माहिती घेतली. त्यांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये अडचणी येणार नाही अशा सूचना प्रशासनाला दिल्या.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी देखील अपघातस्थळी धाव घेत भेट दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर हॉस्पिटलमध्ये दाखल होते. घटनेची पूर्ण माहिती घेऊन जखमी रुग्ण व नातेवाईकांना त्यांनी आधार दिला.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन केले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मदत केली. घटना मोठी व दुर्दैवी असल्याने शासन, प्रशासनाने त्वरित याची दखल घेत उपाययोजना केल्या.

आमदार बाळासाहेब थोरात भेटीसाठी थेट रुग्णालयात :- या अपघातानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी कुटे हॉस्पिटलमध्ये जाऊन भाविकांची भेट घेतली. त्यांची चौकशी करून सर्वांना दिलासा दिला. यावेळी डॉ. प्रदीप कुटे यांच्याकडून जखमींच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. तर या घटनेमुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी चार राज्यातील विजयी जल्लोष कार्यक्रम रद्द करत मृतांना श्रद्धांजली वाहिली.

घटना दुर्दैवी, शासन स्तरावरून मदत देण्यासाठी प्रयत्नशील : आ. थोरात
अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेला वारकरी संप्रदाय आहे. वारकरी विविध दिंड्यांमध्ये सहभागी होतात. दुखापतग्रस्त वारकऱ्यांना तसेच मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना शासन स्तरावरून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ. त्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office