शिर्डी बाह्यवळण रस्त्यावर पिंप्री निर्मळ येथे सोमवारी ग्रामस्थांनी सहा तास रास्ता रोको आंदोलन केले. शिर्डी ते निर्मळप्रिंपी बायपासची दुरवस्था झाली असून खड्डे आणि उडणारा फुफाटा यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्ता अडवला. ट्रकचालकांनीही आंदोलनास पाठिंबा दिला.
आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आम्हाला अटक करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. तहसीलदार कुंदन हिरे यांनी रस्त्याच्या कामात लक्ष देण्याची ग्वाही दिल्यावर आंदोलन थांबले.
शिर्डीतील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी महसूल आणि पोलिस प्रशासनाने जड वाहतूक बाह्यवळण रस्त्यामार्गे वळवली. अगोदरच निकृष्ट रस्ता आणि त्यात जड वाहतुकीमुळे रस्त्याचे तीन तेरा वाजले. एक तर रस्ता दुरुस्त करा, नाही तर वाहतूक बंद करा, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.
रस्त्याची दुरवस्था असताना सुप्रीम कन्स्ट्रक्शनने एक वर्ष कोट्यवधीचा टोल वसूल केला. रस्त्याची दुरवस्था पाहता टोल वसुली बंद करत कंपनीच्या जमा रकमेतून दोन महिन्यांत रस्ता दुरुस्त करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते, तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्म आहे.