जायकवाडीसाठी पाणी सोडताना पाणी मापक यंत्राद्वारे मोजणी व्हावी, शिवसेनेची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- जायकवाडी धरणातून नगर व नाशिक जिल्ह्यातुन ६५ टक्के पाणी देण्यास आमचे काही दुमत नाही परंतु हे पाणी देताना नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणावर बसविलेल्या पाणी मापक यंत्राद्वारे अचूकपणे पाणी मोजून द्यावे.अशी मागणी शिवसेनेच्या उत्तर जिल्हा प्रमूख राजेंद्र झावरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.

झावरे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, पाणी वाटप कायद्यातील तरतुदी नुसार जायकवाडी धरण ६५ टक्के भरल्याशिवाय गोदावरी कालव्यातून शेतीसाठी पाणी देखील मिळत नाही त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असून शेतातील उभी पिके अनेकवेळा पाण्यावाचून जळून जातात.

त्यामुळे शासनाने या कायद्यात लवकरात लवकर बदल करावा तसेच नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून ६५% पाणी सोडताना पाणी मापक यंत्रातून मोजून सोडण्यात यावे तसेच शेतकर्‍यांसाठी असलेला पाणी मागणी अर्ज म्हणजे सात नंबर फॉर्म ऑनलाइन करण्यात यावा अशी मागणी यावेळी जिल्हाप्रमुख झावरे यांनी केली

यावेळी शिवसेना तालुका प्रमूख शिवाजी ठाकरे यांनी सांगितले की, जायकवाडी धरणावरील मंजूर केलेला अन्यायकारी समन्यायी पाणी वाटप कायद्यात बदल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे व रावसाहेब खेवरे यांच्या समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दि २९ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

अशी माहिती शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे यांनी कोपरगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच नगर नाशिक व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासंदर्भात २००५ साली तत्कालीन सरकारने अन्यायकारक समन्यायी पाणी वाटप अधिनियम कायदा मंजूर केला परंतु या कायद्याप्रमाणे कोणतीही कारवाई झाली नाही

म्हणून २०१२ साली शासनाने मंजूर केलेल्या समन्यायी पाणी वाटप कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मेंढेगिरी समिती स्थापन केली आणि या समितीने तयार केलेल्या अहवाल अहवालात जायकवाडी धरण ६५% टक्के भरल्याशिवाय गोदावरी कालव्यांना खरिपाचे आवर्तन सोडण्यात येऊ नये

ही घातलेली जाचक अट तत्काळ रद्द करण्यात यावी अशी शिवसेनेची मुख्य मागणी असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेसाठी उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शहराध्यक्ष कलविदर डडियाल, माजी शहराध्यक्ष भरत मोरे, कोपरगाव विधानसभा कार्याध्यक्ष रावसाहेब थोरात आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.