अहमदनगर बातम्या

Ahmednagar Politics : शिवसेनेलाही विखेंच्या ‘पॉवर’ची खात्री ! खा.लोखंडेंना विखेंच्या भरवश्यावर तिकीट दिले जाणार ?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगरचे राजकारण काही मातब्बर लोकांभोवती फिरते असे म्हटले जाते. त्यात विखे घराण्याचे नाव आघाडीवर येते. बऱ्याचदा अनेक उमेदवारांची खात्री केवळ विखे यांचा वरदहस्त आहे म्हणजे निवडून येईल अशी दिली जाते.

परंतु आता हीच खात्री वरिष्ठांना देखील आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. याचे कारण असे की, शिर्डी मध्ये खा. लोखंडे हे निवडून येतील की नाही अशी चर्चा एकीकडे सुरु असताना खासदार सदाशिव लोखंडे हे खासदारकीची हॅट्‌ट्रिक विखे यांच्या साथीने साधतील

असा विश्वास कल्याणचे खासदार मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी त्यांची हमी घेतल्याने लोखंडे खासदारकीची देखील हॅट्‌ट्रिक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

खासदार सदाशिव लोखंडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा, तसेच मुख्यमंत्री वयोश्री व नारिशक्ती योजनांच्या लोकार्पणप्रसंगी उत्तरेत झालेल्या कार्यक्रमास शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते बोलत होते.

या वेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम, बाळासाहेब मुरकुटे, आमदार डॉ. किरण लहामटे, प्रकाश चित्ते आदी राजकीय मंडळींची उपस्थिती होती.

काय म्हणाले, खा. शिंदे

वर्षानुवर्षे रखडलेल्या निळवंडेचा प्रश्न खासदार लोखंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे आदींच्या सहकार्याने पूर्ण झाला आहे. दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आपले काम करत राहिल्याचा फायदा खा. लोखंडे यांना झालेला आहे. सत्तेत आल्यापासून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत असल्याने या सरकारवर जनतेचा विश्वास वाढत आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी त्यांची हमी घेतल्याने लोखंडे खासदारकीची देखील हॅट्‌ट्रिक करतील असे शिंदे म्हणाले.

महसूलमंत्री विखे म्हणतात…

या कार्यक्रमात महसूलमंत्री विखे यांनीही खा. लोखंडे यांचे कौतुक केले. ते म्हणाले खासदार लोखंडे यांनी समर्पित भावनेने काम केल्याने जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. कामाची धडपड आणि आवड असेल तर जनसामान्य जनता ही राजकीय नेतृत्व घडवू शकते व याचे उत्तम उदाहरण म्हणजे खासदार लोखंडे असल्याचें विखे यांनी म्हटले आहे. आपल्याला राज्यातून ४५ खासदार दिल्लीत पाठवायचे असून त्यात आपले हे खासदारही असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खा. लोखंडे यांना तिकीट नक्की?

खा. शिंदे व मंत्री विखे यांनी खा. लोखंडे यांना खासदारकीची खात्री दिल्याने खा. सदाशिव लोखंडे यांना तिकीट कन्फर्म असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सध्या त्यांना तिकीट दिले जाणार नसल्याच्या चर्चा होत्या. परंतु आता या वक्तव्यानंतर त्यांना तिकीट दिले जाईल अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office