अहमदनगर बातम्या

बोगस शिधापत्रिकामुळे शिवसेना पदाधिकारी अडचणीत सापडणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- बोगस शिधापत्रिकेबाबत शिवसेना पदाधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपचे श्रीराम गणपुले यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने बोगस शिधापत्रिका प्रकरण शिवसेना पदाधिकार्‍याच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

रेशनकार्डवरून सुरू झालेला हा वाद सध्या शिवसेना व भाजपच्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये सुरू असला तरी हा वाद पक्षीय पातळीवर दोन पक्षांमध्ये टोकाला जाण्याची शक्यता आहे.

तहसीलदारांनी या प्रकरणात ठोस भूमिका न घेतल्यास हा वाद उच्च न्यायालयात जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. बेकायदेशीररित्या दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकेचा वापर करणार्‍या

शिवसेनेच्या पदाधिकार्‍याच्या विरोधात तहसीलदारांनी गुन्हा दाखल न केल्यास आपण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी दिला आहे.

शहरातील शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकार्‍याने बेकायदेशीररित्या पिवळे रेशन कार्ड काढले आहे. त्याने दारिद्य्ररेषेखाली असल्याचे भासवून या शिधापत्रिकेचा लाभ घेतला आहे.

भाजपचे शहराध्यक्ष गणपुले यांनी या पदाधिकार्‍याविरोधात तहसीलदारांकडे तक्रार अर्ज केला आहे. मात्र त्यांनी या प्रकरणाबाबत गंभीर दखल घेतली नाही.

यामुळे गणपुले चांगलेच संतप्त झाले असून त्यांनी तहसील कार्यालया समोर हे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान शिवसेना व भाजप पदाधिकार्‍यांचा हा वाद संघटनांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

Ahmednagarlive24 Office