अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा पुरवठा विभाग व कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास चौक परिसरात टाकलेल्या छाप्यात बायोडिझेलचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी सोमवारी रात्री पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या बायोडिझेल तस्करीत शिवसेनेचा शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप सातपुते याचे नाव समोर आले असून तोच या तस्करीचा मास्टरमाइंड असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
या गुन्ह्यात 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, सातपुतेसह 12 आरोपी पसार झाले आहेत. कोतवाली पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
सातपुतेचे नाव समोर आल्याने या प्रकरणात सहभाग असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, बायोडिझेल तस्करीचे नगर येथील प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर अखेर कोतवाली पोलिसांना या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करावा लागला.
याप्रकरणात सातपुते याच्यासह प्रवीण गोरे याचाही सहभाग असून आणखी कोणाची नावे समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
22 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस व पुरवठा विभागाने केडगाव बायपास चौकातील हॉटेल निलच्या मागील बाजूस असलेल्या पार्कींगमध्ये टाकलेल्या
छाप्यात दोन टँकरमधून मालवाहू ट्रकच्या इंधनाच्या टाकीमध्ये बायोडिझेल भरले जात असल्याचे आढळून आले होते. पुरवठा विभाग व कोतवाली पोलिसांनी छापा टाकून बायोडिझेलवर कारवाई केली होती.