अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- तपोवन रस्त्याबाबत शिवसेनेची भूमिका ही विकासाची नाही तर गोंधळ घालून गल्ला भरण्याची आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलाय.
यासंदर्भात विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमार वाकळे, विनित पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, निखील वारे, बाळासाहेब पवार आदींनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या पदाधिकार्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
तपोवन रस्त्याचे काम आ. संग्राम जगताप यांनी मंजूर करून आणले. या रस्त्याचे काम सुरू असताना पहिल्या पावसानंतर तो खचला. त्यामुळे प्रभाग १, २, आणि ७ मधील नगरसेवकांनी पहिल्यांदा बांधकाम विभागाकडे तक्रार केली.
आ. संग्राम जगताप यांनीही पालकमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे राज्य शासनाने समिती नेमून या कामाची चौकशी सुरू केली. या रस्त्याचे काम निकृष्ट झाले असल्याचे या समितीच्याही निदर्शनास आलेले आहे.
त्यामुळे संबंधित ठेकेदारावर जी कारवाई व्हायची ती होणार आहे. लोकप्रतिनिधींचे काम निधी मंजूर करून आणणे असते आणि ते काम दर्जेदार कसे होईल, हे पाहण्याची जबाबदारी प्रशासनाची असते.
त्यामुळे या कामात ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र शिवसेनेने या कामाची चौकशी झाल्यानंतर आरडाओरडा सुरू केला आहे.
त्यांचा हा ढोंगीपणा असून, हा रस्ता होऊ नये, यासाठी माजी आमदारांनी खूप वेळा खटाटोप केला. त्यांच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात हा रस्ता बंद होता.
आ. संग्राम जगताप यांनी हा रस्ता खुला केला. तसेच रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजूर करून आणला. मात्र आता शिवसेनेकडून कल्ला करून गल्ला भरण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप या नगरसेवकांनी केलाय.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com