अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- नगर जिल्हा हा मध्यवर्ती जिल्हा समजला जातो. तसेच शहरातून तब्बल सात राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यामुळे साहजिक शहराला व येथील रस्त्यांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे. मात्र सध्या जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्वच महामार्गाची अवस्था अत्यंत भीषण झाली आहे.
सुमारे चार वर्षांपासून हाती घेतलेला कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही कासव गतीने सुरू आहे. मात्र या दरम्यान या रस्त्याच्या कामामुळे तब्बल १५० निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्याा प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे चुकवताना अनेक लहान मोठ्या वाहनांचा अपघात होत असून, आतापर्यंत या महामार्गावर दीडशेहून अधिक जणांचा या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे बळी गेला असून आणखी किती बळी गेल्यानंतर महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे असा संतप्त प्रश्न आता प्रवाशी विचारत आहेत.
अनेक दिवसांपासून या महामार्गाचे काम रखडल्यामुळे अपघात वाढत असून रविवारी रात्री झालेल्या अपघातात चार जणांचा बळी गेल्याने संबंधीत ठेकेदार व महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.. या पूर्वीचा आणि आत्ताचा दोन्ही ठेकेदार सारखेच असून ठेकेदाराला महामार्गाचे अधिकारी पाठीशी घालत आहेत. या मार्गावर अनेक धोकादायक वळण आहेत तशीच ठेवून थातूरमातूर पध्दतीने काम उरकते घेण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न सुरू आहे.