धक्कादायक! जिल्हा परिषदेत मुद्रांकांची ‘बनवाबनवी’; वाचा सविस्तर…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा परिषदेस मिनी मंत्रालय असे म्हटले जाते. परंतु या ठिकाणी ठेकेदारांनी मुद्रांकांची ‘बनवाबनवी’ करून शासनास गंडा घातला असल्याचा आरोप अ‍ॅड. श्याम आसावा यांनी केला आहे.

या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावेत असे निवेदन त्यांनी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. निवेदनामध्ये त्यांनी , जिल्ह्यातील बांधकाम ठेकेदारांनी मुद्रांक घोटाळा केलेला आहे.

या मुद्रांक घोटाळ्यात एका कामासाठी घेतलेला मुद्रांक अनेक कामांसाठी वापरून शासनाचा मुद्रांक बुडवून गंडा घालण्यात आलेला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामाचे टेंडर निघाल्यानंतर त्यात भाग घेणार्‍या ठेकेदाराने त्या टेंडरबाबत स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक असते.

प्रत्येक स्वतंत्र टेंडरमध्ये भाग घेण्यासाठी स्वतंत्र स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. या स्टॅम्पवर कामाचे नाव नमूद असणे आवश्यक आहे.

कामाचे नाव वगळता सर्वच टेंडर मधील या प्रतिज्ञापत्राचा मजकूर सारखाच आहे. आता टेंडर प्रक्रिया ऑनलाईन होत असल्याने टेंडरमध्ये भाग घेणार्‍या ठेकेदाराने टेंडर संबंधी कागदपत्रे स्कॅन करून बेबसाईटवर अपलोड करण्याची पद्धत आहे.

याचाच गैरफायदा घेत अनेक ठेकेदार वेगवेगळ्या टेंडर मध्ये एकच मुद्रांक वापरत आहे. मुळ प्रतिज्ञापत्र मधील कामाचे नाव कोरे ठेवायचे व ज्या कामाच्या टेंडर असेल

तेथे या मुद्रांक वर पेन्सिलने नाव टाकुन स्कॅन करायचे असे वारंवार केले जाते किंवा मुळ प्रतिज्ञापात्राची झेरॉक्स काढुन त्या कोर्‍या जागेत कामाचे नाव टाकुन ते स्कॅन करायचे.

अशाच पद्धतीने एकच मुद्रांकावरील प्रतिज्ञापत्र त्यात बदल करुन शासनाचा महसुल बुडविण्याचा उद्देशाने फसवणूक केली जात आहे असे अ‍ॅड. श्याम आसावा यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24