अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- मोटार सुरू करण्यासाठी वायर का घेतली, असे म्हणून चक्क सख्खा भाऊ कुऱ्हाड घेऊन अंगावर धावला असल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे.
या घटनेत सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे अशोक चोखा कांबळे (रा. बाभूळगाव खालसा, तालुका कर्जत) याचा जीव वाचला. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथील चोखा कांबळे यांना अनिल चोखा कांबळे, महेंद्र चोखा कांबळे व अशोक चोखा कांबळे असे तीन मुले आहेत.
वडिलोपार्जित जमिनीची सर्व भावांना जमीन वाटप करुन देण्यात आले आहे. मात्र विहीर, त्यासाठी असणारी मोटर, पाईप लाईन व केबल हे सर्व मात्र सामायिक ठेवण्यात आले आहे.
अशोक कांबळे यास त्याच्या पिकांना पाणी द्यावयाचे असल्यामुळे तो विहिरीवर आला व त्याचा भाऊ महेंद्र याला म्हणाला की मला आज शेतातील पिकांना पाणी द्यावयाचे आहे.
यासाठी केबल ज्या ठिकाणी जॉईंट आहे तेथून अशोक याने वायर सोडली असता महेंद्र चोखा कांबळे त्याच्या अंगावर कुर्हाड घेऊन धावला.
तुला आता जिवंत सोडणार नाही असे म्हणत होता. परंतु प्रसंगावधान राखत अशोक हा त्या ठिकाणाहून पळून गेला. यानंतर अशोक कांबळेने कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महेंद्र चोखा कांबळे याच्यावर कर्जत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.