अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
दरम्यान नवीन वर्ष जवळ येत असल्याने साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. परंतु, यातच काही भाविकांना विचित्र अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दिल्लीतील काही महिला भाविकांकडे साईंच्या दरबारी काकड आरतीसाठी उपस्थिती लावण्यासाठी मंदिराकडून 25 हजार रुपयांच्या देणगीची मागणी केल्याची धक्कादायक बाब रविवारी (ता.27) संध्याकाळी उजेडात आली आहे.
या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे हे म्हणाले कि, जो भक्त देणगी देतो त्या भक्ताला मंदिर संस्थानच्यावतीने दर्शन आणि आरतीची व्यवस्था केली जाते.
हा बर्याच वर्षांपूर्वीपासूनचा निर्णय आहे. पण, पैसे दिल्यानंतर आरतीचा पास मिळेल अशी कोणतीही मागणी कधी करण्यात आलेली नाही. सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आरतीचे पास देण्यात येत आहेत.
पण, कोरोनाच्या महामारीमुळे पास वितरणाची संख्या कमी ठेवण्यात आली आहे. परंतु, तरीही पैशांची मागणी करत पास देण्याची अट ठेवल्याची घटना घडल्यास त्याबाबत चौकशी करण्याबाबतचे निवेदन देण्यात येईल.