धक्कादायक : माजी महापौरांच्या मुलाची निर्घृण हत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- दुचाकीला साइड न दिल्यावरून जळगाव शहरात टोळीयुद्धाचा भडका उडाला. बुधवारी रात्री दोन जणांनी तलवार व चॉपरने वार करीत माजी महापौरांच्या मुलाचा खून केला. ही खळबळजनक घटना शिवाजी नगर स्मशानभूमीजवळ घडली. मृत राकेश (वय २८ रा. शिवाजी नगर) हा माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा आहे.

राकेशचा लहान भाऊ सोनू सपकाळे याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सोनू हा रात्री सव्वा अकरा वाजता सलमान शेख युसूफ याच्यासोबत वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी दुचाकीने शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरातून जात होता.

यावेळी विशाल व एक तरूण पाठीमागून दुचाकीने येत होते. त्यांना पुढे जाण्यासाठी साइड दिली नाही म्हणून त्यांनी वेगाने पुढे येत दुचाकी आडवी लावली. तर यानंतर आणखी एका दुचाकीवर गणेश सानवणे व दोन अनोळखी तरूण देखील तेथे पोहोचले. त्या तरुणांनी लाथ मारून सोनूची दुचाकी खाली पाडली.

यांनतर गणेश याने हातातील तलवार सोनूच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. सोनूने डोक्यावरचा वार चुकवला. मात्र, हाताला दुखापत झाली. यानंतर सर्वांनी सोनूला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. याचवेळी सोनूचा मोठा भाऊ राकेश व त्याचा मित्र सचिन लढ्ढा हे दोघे चारचाकीने घटनास्थळी पोहोचले.

राकेशने सुरूवातीला हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी गणेशने राकेशच्या मांडीवर तलवारीने वार केले. सोबत असलेल्या विशालने चॉपरने डोक्यात वार केले. या हल्ल्यात राकेश गंभीर जखमी झाला होता. तसेच घटनास्थळी नागरिकांची गर्दी बघून मारेकरी दुचाकीवरुन पळून गेले.

यानंतर सोनूने दुचाकीने घरी जाऊन मोठा भाऊ राजू याच्यासह कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळी येत जखमी राकेश याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24