धक्कादायक ! कामासाठी बोलाविलेल्या महिलेला लाख रुपयात विकले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- एका महिलेला स्वयंपाकीच्या कामासाठी बोलावून इंदूरच्या एका व्यक्तीला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या महिलेच्या पतीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मधील मोतीनगर भागात राहणार्‍या एका तरुणाने याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिता रविंद्र कदम (रा.आंबेडकर वसाहत, दत्तनगर, श्रीरामपूर) व अनिता कदम हिची मैत्रीण संगीता (पूर्ण नाव माहित नाही) या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी पतीने म्हंटले आहे कि, वरील दोन्ही महिलांनी माझ्या पत्नीला स्वयंपाकीच्या कामासाठी बोलावून घेतले. तिला काम मिळवून देण्याची आणि त्या बदल्यात चांगला पगार देण्याची फूस लावून मालेगावहून श्रीरामपूरला आणले.

त्यानंतर आरोपी अनिता कदम व तिच्या मैत्रिणीने माझ्या पत्नीला मध्य प्रदेशातील इंदूर येथे नेले. तेथे एका व्यक्तीकडून 1 लाख 20 हजार रुपये घेवून तिला त्याच्या ताब्यात दिले. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही महिला आरोपींविरुद्ध अपहरण आणि मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24