धक्कादायक ! मृत कोंबड्यांचे अवशेष ओढ्यात फेकले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- देशासह राज्यात बर्ड फ्ल्यू या रोगाने कहर केला आहे. यामुळे दरदिवशी अनेक कोंबड्यांचे प्राण जात आहे. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, हे सगळं घडत असताना जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शहराजवळील ओढ्यात अज्ञाताने मृत कोंबड्यांचे अवशेष व कुक्कुटपालनाची घाण टाकल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.

यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः बर्ड फ्ल्यू संसर्गाच्या दुर्लक्ष करुन अशाप्रकारे मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. शहराच्या पूर्वेकडील सोनमिया देवस्थान, अमरधाम, पैठण रस्त्यावरील नित्यसेवा वळणावरील नाल्यात,

हिफळ रस्त्यावरील स्मशानभूमीसमोर काही दिवसांपासून कुक्कुटपालन, चिकन व मटन व्यावसायिक मृत कोंबड्या, त्यांचे अवशेष व इतर घाण गोण्यांमध्ये भरून आणून टाकतात. ते मांस सडून व कुजून त्याची दुर्गंधी सुटते. मोकाट कुत्री व डुकरांचा त्यावर मुक्त संचार सुरू असतो.

त्याचा रहिवाशांना मोठा त्रास होतो. ही घाण विखुरल्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. वास्तविक, मृत पक्ष्यांचे अवशेष नष्ट करण्यासाठी ते खड्ड्यात पुरणे आवश्यक आहे. पालिकेनेही त्यासाठी जागा व यंत्रणा उपलब्ध करून द्यायला हवी.

मात्र, याबाबत संबंधित व्यावसायिक व पालिकाही गंभीर नसल्याचे दिसते. काही दिवसांपासून चुकीच्या पद्धतीने उघड्यावर टाकलेल्या पक्ष्यांच्या अवशेषांमुळे आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला असून, अशावेळी खालची वेस भागातील नदीत कोणीतरी गोण्यांमध्ये भरून मृत कोंबड्या आणून टाकल्या आहेत.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पालिका प्रशासनाने खड्डा खोदून या गोण्या पुरल्या.

अहमदनगर लाईव्ह 24