अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये अनेकदा बिबट्याचा वावर जास्त आढळून आला आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे मानवीवस्तीवर हल्ले वाढले आहे.
यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान नुकतेच संगमनेर तालुक्यात एक ऊसतोड कामगार तोडीसाठी बैलगाडीतून शेतात चालले होते. त्याच दरम्यान रस्त्याच्या कडेला ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेला बिबट्या अचानक ऊसतोड कामगारांच्या पाठीमागे धावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, काल (शुक्रवार ता.11) पहाटे पाच वाजेच्या सुमारास ऊसतोड कामगार बैलगाड्या घेवून घारगाव येथून शेळकेवाडी शिवारात जात होते. त्यातील काही बैलगाड्या पुढे गेल्या होत्या तर एक बैलगाडी मागे होती.
त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतातून बिबट्या अचानक बाहेर आला आणि थेट बैलगाडीच्या दिशेने धाव घेतली. यामुळे कामगाराची अक्षरशः भंबेरीच उडाली आणि मोठमोठ्याने आरडाओरड करत बैलगाडी जोरजोराने पळवली. त्याचा आवाज ऐकून इतर ऊसतोड कामगारही घाबरून गेले.
त्यांनी तात्काळ आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे त्याच्याही जीवात जीव आला. त्यानंतर कामगाराने सर्व हकीगत बाकीच्या ऊसतोड कामगारांना सांगितली. दरम्यान बिबट्याचे वाढत्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.