अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबांचा 103 वा श्रींचा पुण्यतिथी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे.
या वर्षी गुरुवार दि. 14 ते रविवार दि. 17 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
दरम्यान यावेळी संस्थांच्या सीईओ बानायत म्हणाल्या, यावर्षीही करोना व्हायरसच्या संकटामुळे शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आला होता.
राज्य शासनाने 7 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे काही अटी-शर्तीवर खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शन तत्वांवर श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे.
परंतु अजून करोना व्हायरसचे सावट संपलेले नसल्यामुळे गुरुवार 14 ते रविवार 17 ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येणारा श्रींचा पुण्यतिथी उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे.
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे,
मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ. आकाश किसवे, दिलीप उगले, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी हे प्रयत्नशिल आहेत.