Ahmednagar News : शहरातून वाहत असलेल्या सिनानदीला आलेल्या पुरामुळे पूर परिस्थिती निर्माण होवून जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी नदीतील पूर नियंत्रण उपाययोजना करून नदीतील गाळ काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
सिनानदीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी खा. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्यक्षात सिनानदीची पाहणी केली होती.
या पार्श्वभूमीवर ही बैठक संपन्न झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा अंतर्गत यांत्रिक विभागाला इंजिनियर, मनुष्यबळ व यंत्र सामुग्री पुरवण्याचे आदेश दिले. याला जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर यांनी मंजुरी दिली.
सिनानदीच्या खोलीकरण व रुंदीकरण झाल्यावर पूर रेषा स्थलांतरित होणार आहे. यास त्यांनी मान्यता दिली, तसेच जिल्हा नियोजन समिती अहमदनगर यांनी इंधन पुरवण्याचे काम करावे हे जिल्हाधिकारी यांनी ऑनलाईन व्हिसीद्वारे उपस्थित राहून मान्य केले.
तसेच सिना नदीतील काढलेला गाळ पुन्हा नदीत वाहून जावू नये म्हणून त्याची स्वतंत्र ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी, खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर सिना नदीला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त होईल हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर सिना नदीची हद्द निश्चित होवून स्थलांतरित होणार आहे.
दरम्यान, नगर शहरात सिनानदीचे पात्र सुमारे १३ किमीचे असून यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसामुळे येणाऱ्या पुराचे पाणी नगर शहरातील काही भागांमध्ये नागरिकांच्या घरात, दुकानात शिरत असते. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते.
त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी नदीतील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे होते. आ. जगताप म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही समस्या लक्षात घेवून तातडीने बैठकीचे आयोजन करत ही समस्या मार्गी लावली आहे.
नगरकरांची अनेक वर्षाची ही अडचण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडविल्याबद्दल खा. विखे यांनी आभार व्यक्त केले.