अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- परतीच्या पावसाने श्रीरामपुर तालुक्याला झोडपून काढल्याने तालुक्यातील खरीप पीक धोक्यात आले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी नुकसानग्रस्त पिकांचा पाहणी दौरा सुरू केला. काही भागात रस्ते जलमय व चिखलमय झाल्याने त्यांना बैलगाडीतून पाहणी दौरा करावा लागला. ज्या भागातील रस्त्यांचे वाटोळे झालेले आहे त्या रस्त्याने आम्ही जन्मोजन्मी प्रवास करतो आहोत,
आता तुम्ही तरी रस्ते करा साहेब असे साकडे या भागातील शेतकऱ्यांनी आमदार कानडे यांना घातले. परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात खरीप पिकांवर संक्रांत आली आहे.हाता तोंडाशी आलेले सोयाबीन, कपाशी, मूग,मका आदी पिके उपळली आहेत. तर वादळी पावसामुळे ऊसाचे पिकेही आडवी झाली आहेत.
या पार्श्वभूमीवर हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार कानडे यांनी शुक्रवारपासून पाहणी दौरा सुरू केला. शुक्रवारी त्यांनी गोदावरी पट्ट्यातील काही गावांचा दौरा केला आहे.त्यांच्या समवेत जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, जेष्ठनेते इंद्रभान थोरात, सतिश बोर्डे,कृषी सहायक अनिल शेजुळ,
तलाठी एन. व्ही. नागापुरे, ग्रामसेवक मनोज लहारे, बाबासाहेब कोळसे, गोविंद वाघ, राजेंद्र औताडे, अशोक गायकवाड, जुनेद पटेल, माजी सरपंच ज्ञानेश्वर बुचुडे आदी होते.आमदार कानडे श्रीरामपूर येथून सकाळी गोदावरी नदी परिसरात जाण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांना वैजापूर-श्रीरामपूर खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागला.
रस्त्यावरील खड्डे चुकवत अखेर त्यांनी नायगाव शिवार गाठले. अतिपावसामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आमदार कानडे यांनी बैलगाडीतून प्रवास केला. अतिपावसामुळे खराब झालेल्या सोयाबीन, कापुस, मका, ऊस, बाजरी पिकांची आमदार कानडे यांनी पहाणी करुन नुकसान भरपाईची ग्वाही दिली.
परतीच्या पावसाने तालुक्यात थैमान घातले आहे. गोदावरी नदीपट्यातील शेकडो एकर खरीपाचे पिक बाधित झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved