अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-आज सकाळपासून शहरासह जिल्ह्यात थंडगार वारे वाहू लागले असून ढगाळ वातावरण झाले आहे.
वातावरणातील चढ उतारामुळे सध्या नगरकरांना ऐन थंडीत पावसाळयाचा अनुभव येत आहे. शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत आज ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान 5 ते 12 जानेवारी दरम्यान राज्यात नगरसह उत्तर महाराष्ट्र तसेच विविध भागात हलक्या स्वरूपाचा पाउस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पावसाळयाच्या सुरवातीला निसर्ग चक्रीवादळ आणि ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचा फटका या हवामान बदलामुळे सध्या वातावरणात मोठया प्रमाणात चढ उतार बघायला मिळत आहे.
डिसेंबरमध्ये तापमानात 8 अंशापर्यंत घट झाली. परंतु गेल्या तीन चार दिवसांपासून तापमानाचा पारा 18 अंशापर्यंत जाउन पोहचला आहे.
दरम्यान बदलत्या हवामानामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र तसेच विविध भागात हलक्या पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बदलत्या हवामानामुळे पिकांचं नुकसान होईल या भितीने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. सध्याच्या स्थितीतील वातावरणामुळे काही ठिकाणी गहू, हरबरा या पिकांवर मावा,
तर ज्वारीवर चिकटा पडला आहे. अशीच परिस्थिती आठ-दहा दिवस कायम राहिल्यास रब्बी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.