Ahmednagar News :
Ahmednagar News : राज्यात एकीकडे वाढत असलेले पशुखाद्याचे दर तर दुसरीकडे कमी होत असलेले दुधाचे दर यामुळे दूध व्यवसाय करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. याबाबत वारंवार आवाज उठवून देखील सरकार सकारात्मक पावले उचलत नाही.
त्यामुळे हवालदिल झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. अकोले तालुक्यातील गणोरे बाजारतळ येथे दूध दरासंदर्भात तरुण शेतकरी संदीप दराडे व शुभम आंबरे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून, या उपोषणाला बळ देण्यासाठी दोन्ही तालुक्यातील दूध उत्पादक एकवटल्याचे दिसत आहे. या शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे.
शासनाच्या धोरणांचा निषेध म्हणून जिल्ह्यातील विविध ठिकाणी रास्ता रोको तर अकोले व संगमनेर व तालुक्यातील ११ गावे बंद ठेवून, शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.
या पार्श्वभूमीवर गणोरे गावासह आढळा खोऱ्यातील गावांमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाल्याचे चित्र दिसले. दरम्यान, गणोरे येथील आमरण उपोषण सलग सहाव्या दिवशी सुरुच होते. या उपोषणाला बळ देण्यासाठी दोन्ही तालुक्यांतील दूध उत्पादक शेतकरी एकवटल्याचे चित्र ही दिसत आहे.
गणोरे, हिवरगाव आंब्रे, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी, समशेरपूर, वडगाव लांडगा, गुंजाळवाडी, सावरगाव पाट, विरगाव, कळस, मेंगाळवाडी आदी संगमनेरसह अकोले तालुक्यातील ११ गावांनी दूध उत्पादकांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत उत्स्फूर्त व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, शासनाने तातडीने दूधउत्पादकांच्या मागणीची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.शासनाने दूध दर वाढीसंदर्भात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचे गुपीत धोरण ठरविण्यात आले आहे. या आंदोलनाचा केव्हाही उद्रेक होवू शकतो, असे वास्तव चित्र दिसत आहे.
दरम्यान ‘दूध व्यवसाय शेतीचा हमखास पुरक धंदा आहे. दूध दराबाबद आंदोलनाला आणखी वेगळे उग्र रुप देता येईल, परंतु असे नाही की, उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष करावे. त्यांची काळजी घ्यावी लागेल.
आमदारांनी दुधासंदर्भात तारांकीत प्रश्न मांडला. तो लवकरचं चर्चेला येणार आहे. उसाप्रमाणे दुधाला एफआरपी मिळाली पाहिजे. दूध उत्पादकांना थेट हमी भाव मिळावा.अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केली.