Ahmednagar News : मुळा नदीवरील मुळा धरण हे गोदावरी खोऱ्यात येते तर नगर शहर हे कृष्णा खोऱ्यात येते. त्यामुळे गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असल्याने तुटीच्या खोऱ्यातील मुळा धरणाचे पाणी विपुल अशा कृष्णा खोऱ्यातील नगर शहर व तालुक्याला देणे अन्यायाचे ठरणार असल्याने या मागणीस आमचा विरोध असल्याचे बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात खंडागळे यांनी म्हटले आहे की, मुळा धरणाचे पाणी नगर, पाथर्डी व शेवगाव तालुक्याना मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी कामगार मुकादम युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी केली आहे.
ही मागणी मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांसाठी अन्यायाची आहे. मुळात मुळा धरण ज्या गोदावरी खोऱ्यात येते ते गोदावरी खोरे वर्गीकरणानुसार तुटीचे खोरे आहे. या खोऱ्यात समन्यायी पाणी वाटप कायद्यावरुन अगोदरच असंतोष आहे.
त्यात मुळा धरणाचे पाणी कृष्णा खोऱ्यातील नगर तालुक्यास देणे हे धोक्याचे ठरणार असल्याचे खंडागळे म्हणाले. पाथर्डी व शेवगाव तालुके गोदावरी खोऱ्यात येतात. त्याबाबत प्रश्न नाही. मात्र नगर शहर व तालुका हा कृष्णा खोऱ्यात येतो. कृष्णा खोरे हे वर्गीकरणानुसार विपुल खोरे आहे. याचा अर्थ या खोऱ्यात प्रचंड पाणी उपलब्ध आहे.
त्यामुळे नगर तालुक्यासाठी कृष्णा खोऱ्यातूनच पाणी उपलब्ध करणे न्याय्य ठरेल. यादृष्टीने कृष्णा-भिमा स्थिरीकरण योजना तातडीने पूर्ण करावी.
तसेच या स्थिरीकरणातून उजनी धरणास उपलब्ध होणारे पाणी सिना प्रकल्पात आणून तेथून बॅक वॉटरवर उपसा सिंचन पद्धतीने नगर शहर व एम. आय.डी.सी, सुपा एम.आय.डी. सी. तसेच नगर तालुक्याला पाणी उपलब्धता करावी, अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे.
गोदावरी खोऱ्यातील जनतेने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष ठेवून दक्ष राहावे, असे आवाहन देखील खंडागळे यांनी केले आहे.