अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- घोटाळ्यामध्ये अडकलेली नगर अर्बन बँक गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. याच दरम्यान नगर अर्बन मल्टिस्टेट शेडयुल्ड बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.
संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 30 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नगर अर्बन बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशी बुधवारी एकजणाने अर्ज दाखल केला आहे.
संजयकुमार शांतिलाल भळगट यांनी महाराष्ट्र राज्य सर्वसाधारण या मतदारसंघातून हा अर्ज भरला आहे. दरम्यान बुधवारी 27 व्यक्तींनी 127 अर्ज नेले आहेत. मंगळवारी 11 जणांचे अर्ज दाखल झाले होते.
आजपर्यंत 12 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. बँकेच्या 18 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत दोन पॅनेल तयार होत आहेत. बँकेची सत्ता खेचून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते राजेंद्र गांधी यांनी जुन्या- नव्यांचा मेळ घालून उमेदवार देण्याचे नियोजन केले आहे, तर माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी उमेदवारांची मोर्चे बांधणी केली आहे.
या बँकेचे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्र व गुजरातमध्ये मतदार आहेत. दरम्यान बँक बचाव समितीच्यावतीने गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर आज, गुरूवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
बँकेच्या 18 जागांसाठी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. 3 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाणनी होणार आहे.
त्यानंतर वैध उमेदवारी अर्जांची यादी 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार असून, 15 नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. या निवडणुकीसाठी 56 हजार मतदार असून 1 हजाराचे शेअर्स असणार्या मतदानाचा अधिकार आहे.