अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-करोना विषाणुच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने दिनांक 17 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेले होते. त्यानंतर साईमंदिर देखील बंद ठेवण्यात आले होते.
अखेर 16 नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे.
मंदिर खुले करण्यात आल्यानंतर दिनांक 16 ते 27 नोव्हेंबर 2020 या कालावधीत 91 हजार 136 साईभक्तांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तर या काळात श्री साई प्रसादालयामध्ये सुमारे 1 लाख 10 हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
तसेच या कालावधीत संस्थानचे साईआश्रम भक्तनिवास, व्दारावती भक्तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्तनिवास्थान (500 रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्थानांव्दारे 21 हजार 124 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे कान्हूराज बगाटे यांनी सांगितले.
कान्हूराज बगाटे म्हणाले, करोनाचा धोका पाहता साईंच्या दर्शनाकरीता सामाजिक अंतराचे पालन करुन ठरावीक संख्येनेच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे साईभक्तांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन बुकींग निश्चित करुनच शिर्डी येथे श्रींच्या दर्शनाकरिता यावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved