अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- राज्यासह नगर जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यातच कोरोनाचा संसर्ग आता थेट शासकीय कार्यालयात देखील पोहचला आहे.
नुकतेच नगर शहरातील जिल्हा परिषदेत अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्याने करोना बाधित होत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांचा करोना अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह आला आहे.
त्यांच्यासह तालुकास्तरावर ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पूरविण्याची जबाबदारी असणार्या जिल्ह्यातील 14 तालुकाधिकार्यांपैकी 7 तालुका आरोग्य अधिकार्यांना करोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान झेडपीच्या आरोग्य विभागातील कर्मचारी अचानक आजारी पडले. यामुळे त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली असता, यात 14 कर्मचारी बाधित आढळले.
त्यांच्या सोबत सहवासात असणारे आणखी चार कर्मचारी आजारी पडल्याने त्यांना सुट्टी घेवून घरी राहण्यास सांगण्यात आले.
यासह पाणी पुरवठा विभागातील 7 कर्मचार्यांचा करोनाचा अहवाल पॉझिटीव्ह असून पशूसंवर्धन विभागातील एका अधिकार्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे.
तसेच कृषी आणि बांधकाम विभागातील प्रत्येकी एक असे 24 जणांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. करोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्यालयच कोविडचे हॉटस्पॉट ठरू पाहत आहे.