अहमदनगर बातम्या

म्हणून एसटीची पहिलीच ई-बस झाली लेट

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Pune Electric Bus : एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षात एसटीची ई-बस सेवा सुरू झाली. ज्या नगर-पुणे मार्गावर एसटीची पहिली बस धावली, त्याच मार्गावर पहिली ई-बसही धावली.

मात्र, पुण्यातील उद्घाटनाचा कार्यक्रम लांबल्याने दोन्ही बाजूंनी सोडण्यात येणाऱ्या बस नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुटल्या.पुण्यातून ऐतिहासिक वडाच्या झाडाखालून तर नगरच्या तारकपूर बसस्थानकात समारंभपूर्वक या सेवेला प्रारंभ झाला.

पुण्यातील उद्घाटन कार्यक्रम लांबल्याने नगरची तयारी असूनही प्रत्यक्ष गाडी सोडण्यास विलंब झाला.सकाळी साडेनऊ वाजता दोन्ही बाजूंनी गाड्या सोडण्याचे नियोजन होते. नगरचा कार्यक्रम वेळेत झाला.

पुण्यात उशीर झाल्याने प्रत्यक्ष गाडी सोडण्यास उशीर झाला. एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांच्या हस्ते पहिल्या ई-बसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरच्या महापौर रोहिणी शेंडगे, नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, एसटीचे विभाग नियंत्रक विजय गिते, विभागीय वाहतूक अधिकारी वासुदेव देवराज उपस्थित होते.

उद्यापासून दररोज सकाळी ७ वाजता ई-बस तारकपूरहून पुण्याकडे जाणार आहे. यासाठी २६० रुपये प्रवास भाडे आहे. पहिल्या दिवशी बसमध्ये प्रवासीसंख्या अल्पच होती.

Ahmednagarlive24 Office