२९ जानेवारी २०२५ टाकळीभान : येथील टेलटँक मधून शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या मागणी १६ चारीवरील लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी कल्हापूरे यांना नुकतेच निवेदन दिले आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टाकळीभानसह परिसरातील विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याने तळ गाठला असून पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे.
त्यामुळे त्याचा फटका सध्या रब्बी हंगामातील पिकांना बसत आहे. मागील १५ ते २० दिवसांपूर्वी शेतीचे आवर्तन सुटले होते.मात्र त्यावेळी शेतकऱ्यांच्या उसाला तोडी सुरू असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पाणी घेतले नाही. चारी नं. १६ वरील शेतकऱ्यांच्या विहीरी व कुपनलिकेने तळ गाठला असून रब्बी हंगामातील कांदा, गहु, हरभरा, मका आदी पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.
मात्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने पाण्याअभावी उभी पिके होरपळून जात असल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे. तसेच जनावरांचा चारापिके व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गडद होतांना दिसून येत आहे.येत्या एक ते दोन दिवसात या पिकांना पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.
त्यामुळे लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, उशीरा सोडलेल्या आवर्तनाचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही व कधीही न भरून होणारे नुकसान होईल.त्यामुळे जलसंपदा विभागाने लवकरात लवकर टाकळीभान टेलटँकमधून शेतीसाठीचे आवर्तन सोडावे,अशी मागणी चारी नं. १६ वरील लाभधारक शेतकऱ्यांनी केली असून आवर्तन न सोडल्यास रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सदर निवेदनावर अजित थोरात, भारत भवार, पवन मिरीकर, विलास बोडखे, अमर धुमाळ, तुकाराम कांबळे, बबनराव मगर, अनिल बोडखे, किरण बोडखे, राजेंद्र बोडखे, बाळासाहेब पटारे, चित्रसेन रणनवरे, प्रसाद बोडखे, तुकाराम बोडखे, पाराजी रणनवरे, राहुल वेताळ, द्वारकानाथ बोडखे, सुनिल बोडखे, सुनिल त्रिभूवन, उमेश त्रिभूवन आदींसह लाभधारक शेतकऱ्यांच्या सह्या आहे.