अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, कार्यकर्त्यांसह पुढारी मंडळी निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. यातच जिल्ह्यात बिनविरोध निवडणुकीची चर्चा सध्या जास्तच रंगू लागली आहे.
याच अनुषंगाने लोकप्रतिनिधी देखील घोषणा करत आहे. आता या घोषणांना नागरिकांकडून देखील साथ मिळत आहे. याबाबत नुकतेच आमदार निलेश लंके यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.
याच अनुषंगाने ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे म्हणाले कि, बिनविरोधरोध निवडणूकांचा उपक्रम महत्वाचा असून ग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवडणूकांसाठी आ. लंके यांचा प्रचारक म्हणून मी काम करणार आहे.
पारनेर – नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी होणार असून त्या त्या गावांतील नागरीकांनी बिनविरोध निवडणूक करावी,
आमदार निधीमधून त्या गावांना २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आ. नीलेश लंके यांनी केली आहे. निवडणूका बिनविरोध करण्यासाठी आ. लंके हे स्वतः विविध गावांच्या बैठका घेत असून शुक्रवारी सुपे गटातील बैठकांदरम्यान राळेगणसिद्धीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पार्श्वभुमिवर शनिवारी सकाळी आ.निलेश लंके यांनी राळेगणसिद्धीत जाउन हजारे यांची भेट घेतली. बिनविरोध निवडणूकांदर्भातील माहिती त्यांनी हजारे यांना दिली. यावेळी बोलताना हजारे यांनी संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतींनी राळेगणसिद्धीचा आदर्श घेण्याचा आवाहन केले आहे.