अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- नगर-कल्याण रोड, जाधवनगर येथील संग्राम अग्रवाल (वय 81) यांचे रविवार दि.27 डिसेंबर रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करुन एक वेगळा सामाजिक संदेश दिला.
ते वृत्तछायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल, संपदा ट्रस्टचे प्रकल्प अधिकारी अमर अग्रवाल व वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सचिन अग्रवाल यांचे वडिल होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. धार्मिक, मनमिळावू स्वभावाचे असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा अंत्यविधी शहरातील नालेगाव अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात पार पडला. यावेळी पत्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी, राजकीय व सामाजिक आदि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.