एमआयडीसी परिसरत कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात काम करत असून या परिसरातील नागापूर चौक ते निंबळक रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडल्यामुळे दळणवळणासाठी नागरिकांचे हाल होत आहे.
या रस्त्यावर दुभाजक नाही तसेच पथदिवे नसल्याने अंधारात प्रवास करताना या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात होत असून त्यात काहींचा मृत्यू देखील झाला आहे, मनमाड महामार्गावरील नागापूर चौकातील बंद पडलेला सिग्नल तातडीने सुरु करावा, अशी मागणी उपअभियंता संदीप बडगे यांच्याकडे नगरसेवक अशोक बडे व माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांनी निवेदनातून केली.
या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी देखील होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. याचबरोबर एमआयडीसीतील कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावून मोफत आरोग्याच्या सुविधा मिळाव्या यासाठी कामगार रुग्णालय उभारण्यात यावे, एल अँड टी कॉलनीतील ओपन स्पेसमध्ये नागरिक फिरण्यासाठी येत असतात,
लहान मुले युवक खेळण्यासाठी येथे येतात. मात्र येथे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे तरी येथे पथदिवे बसवण्यात यावे, तसेच मनमाड महामार्गावरील नागापूर चौक ते विळद घाटापर्यंत पथदिवे बसविण्यात यावे, एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांची कामे करावी व बंद पथदिवे तातडीने सुरु करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सहाय्यक उपअभियंता रवींद्र थोटे, भाकचंद भाकरे, वामन आडकर, पंढरीनाथ सप्रे, राजेंद्र कांबळे, रामदास खोडदे, प्रभाकर पवार आदी उपस्थित होता. यावेळी उपअभियंता संदीप बडगे यांनी लवकरात लवकर ही कामे मार्गी लावू तसेच एमआयडीसीत कामगार हॉस्पिटल उभारण्याबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन दिले.