Ahmednagar News : नगरच्या बसस्थानकात तसेच बस प्रवासात गेल्या काही दिवसांमध्ये पाकीट चोरी, दागिने, पर्स, चोरीच्या घटना वाढल्या आहेत. नगर शहर हे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट आणि विदर्भ मराठवाड्याला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शहरातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांची जुन्या बसस्थानकात तर परजिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांची पुणे बसस्थानकात दररोज मोठी गर्दी होत असते.यात विशेषतः महिलांना एस.टी. बस प्रवाशी भाड्यात राज्य सरकारने सवलत जाहीर केलेली असल्याने एस टी बस प्रवासासाठी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे.

महिलांची गर्दी वाढण्याबरोबरच या गर्दीत बसमध्ये चढताना, उतरताना महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्स मधील दागिने, पैसे चोरी जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. चोरटे गर्दीत मिसळून हातसफाई करत आहेत.
गेल्या काही दिवसांत या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने नगर मधील बस स्थानके चोरट्यांचे अड्डे बनले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.मागील काही दिवसांपूर्वी पाथर्डी बस बसस्थानकात बसमध्ये चढत असताना एका खिसेकापूचा खिसा कापतानाचा विडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. सध्या आषाढीच्या पार्श्वभूमीवर बस बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते याच गर्दीचा अनेक भामटे फायदा घेत आहेत.
नगर शहरातील स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानकात बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या बॅग मधून सोन्याचे दागिने ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. १३) सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली आहे.
याबाबत निशा दौलतराव लाड (रा. अंमळनेर, जळगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी लाड या गावी जाण्यासाठी पुणे बसस्थानकावर बस मध्ये चढत असताना तेथे झालेल्या गर्दीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅग मधून सोन्याचे मिनीगंठण कर्णफुले, कुडकाचे जोड तसेच ३९ हजारांची रोकड असा ७८ हजार रुपयांचा ऐवज ठेवलेली पर्स चोरून नेली.
चोरीची घटना लक्षात आल्यावर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.