अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- बिबट्यांच्या संख्येत होत असलेली वाढ आदिवासींबहुल व बिगर आदिवासी भागातील नागरिकांचीही डोकेदुखी बनली आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले.
शेंडी (भंडारदरा) व मुरशेत रस्त्यालगत असलेल्या दुंदा गोलवड व रंजना सुनील भांगरे या आदिवासी कुटुंबाला “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ याचा अनुभव आला. समशेरपूर येथे तर दोन बिबट्यांनी गायीवर एकत्रित हल्ला केला.
समशेरपूर येथील मच्छिंद्र रामनाथ भरीतकर यांची गाय नेहमीप्रमाणे घरासमोर बांधलेली होती. शुक्रवारी रात्री संधी साधून दोन बिबट्यांनी गायीवर झडप घालून अंधारात तिची शिकार केली.
शनिवारी पहाटे झोपेतून उठल्यावर नित्यक्रम म्हणून शेणकूर करण्यासाठी व गाईला पाणी पाजण्यासाठी किटली घेऊन भरीतकर गेले असता त्यांना आपली गाय रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली दिसली. त्यांनी शेजारच्या शेतकऱ्यांना बोलावून घेऊन बारकाईने बघितल्यावर गायीच्या गळ्यावर बिबट्याचे दात व नखे लागलेली दिसली.
जमिनीवर व शेणावर बिबट्यांच्या पंजाचे ठसे दिसले. वनविभागाला घटनेची माहिती दिल्यानंतर वनक्षेत्रपाल जयराम गोंदके यांनी भेट देऊन पहाणी केली. घटनास्थळाचा पंचनामा केला.