Ahmednagar News : जिल्ह्यात सलग दोन दिवस कोसळत असलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. हा पाऊस जिल्ह्याच्या दक्षिणेतील जवळपास सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पावसाने अनेक भागातील खरीप पिकांना जीवदान मिळाले असून, पाणीटंचाईचा प्रश्न शंभर टक्के मिटला आहे. गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले होते. आता मात्र हे संकट टळले आहे.
पिकासाठीची चांगली ओल झाल्याने किमान पंधरा दिवस पाऊस लांबला तरी पिकांची गरज भागली आहे. नेहमीच्या अनुभवाप्रमाणे आषाढी वारी झाल्यानंतर म्हणजे पुष्य नक्षत्राच्या आसपास या भागात पावसाला सुरुवात होते.

यंदा मात्र आषाढी एकादशीच्या दोन दिवस अगोदरच आषाढ सरींनी बळीराजाला सुखावले असून, ही तर पांडुरंगाची कृपा, अशी भावना बळीराजाची झाली आहे.
दरम्यान या दमदार पावसाने जामखेड तालुक्यातील लेंडी नदीला पूर आला. तालुक्यातील धोत्री व रत्नापूर तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाले. फक्राबाद, पिंपरखेड, वंजारवाडी व चोंडी येथील कोल्हापूर बंधाऱ्यांत देखील मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.
जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी वरदान ठरलेला भुतवडा तलाव ७० टक्के भरला आहे. भुतवडा तलावाच्या वरील बाजूस असलेल्या रामेश्वर येथील धबधबा वाहत आहे.
जामखेड शहर व परिसरात मागील आठ दिवसांपासून कमी-जास्त प्रमाणात खरीप पिकांना पोषक पाऊस सुरू आहे. यामुळे नदी, नाले, लहान बंधारे वाहते झाले. जून महिन्यात वेळेवर व पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या १०० टक्के म्हणजे ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
दमदार पावसामुळे पिके जोमात आहेत. नदी नाले, विहिरी तुडुंब भरल्या. तालुक्यातील महत्त्वाचा मोहरी तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. आठ दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाने रत्नापूर व धोत्री तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे.
तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. मात्र आता हे दोन प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने या भागातील पाण्याची समस्या मिटणार आहे. तसेच धोंडपारगाव तलाव नुकताच ओव्हरफ्लो झाल्याने कौतुका नदी झुळूझुळू वाहू लागली. परिसरातील शेतकर्यांमध्ये समाधानाचेे वातावरण आहे.
सध्या जामखेड सौताडा महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यातच सौताडा जवळील पूल काही दिवसांपूर्वी वाहून गेला होता. आज परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, त्यामुळे नदीला पूर आला होता, त्यातच पिंपळवाडीजवळील लेंडी नदीवर असलेल्या पुलाला आगोदरच काही ठिकाणी तडे गेले होते. आता तर पुलच खचला आहे, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसाने खरिपातील पिके जोमात येणार असल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.