अहमदनगर बातम्या

जिल्ह्यात खरिपाच्या ६ लाख ९९ हजार हेक्टरवर पेरण्या, सोयाबीनला मिळाली सर्वाधिक पसंती !

Published by
Ahmednagarlive24 Office

जून, जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यात खरिपाच्या ६ लाख ९९ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, सर्वाधिक १ लाख ६९ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३३१ मिमी पाऊस झाला असून, सर्वच तालुक्यात २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.

नगर जिल्ह्यात १ जून ते ६ ऑगस्टदरम्यान झालेल्या पावसामुळे खरिपाची पिके जोमात आहेत. सर्वाधिक जामखेड तालुक्यात ४८५ मिमी पावसाची नोंद झाली. नगर जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने, जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा, गोदावरी, प्रवरा नदीपात्रांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

बुधवारी सायंकाळी ६ वाजता भीमा नदीतून दौंड पुलाखालून २० हजार ३६१ क्युसेक, गोदावरी नदीतून नांदूर मध्यमेश्वर धरणात ४ हजार ६९४ क्युसेक व भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत १ हजार ९९८ क्युसेक, निळवंडे धरणातून २ हजार ६४५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या दमदार पावसामुळे ६ लाख ९९ हजार ५०२ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये सोयाबीनच्या १ लाख ६९ हजार, कपाशीच्या १ लाख ५५ हजार, मकाच्या ७७ हजार ७००, बाजरीच्या ७४ हजार ९००, तुरीच्या ७४ हजार ७३३, उडदाच्या ६४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

आतापर्यंत झालेला पाऊस
नगर ३४४, श्रीगोंदे ४३१, कर्जत ४४६, जामखेड ४८५, पाथर्डी ४५९, संगमनेर २५०, पारनेर ३५०, शेवगाव ३१८, नेवासे २५०, राहुरी २३१, अकोले ३६७, कोपरगाव २३६, श्रीरामपूर २३१, राहाता २४१ मिमी पावसाची नोंद झाली.

Ahmednagarlive24 Office