एसपी साहेब चोर मचाए शोर….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-नगर शहर परिसरात वाहन चोरी, सोनसाखळी चोरी, व्यापार्‍यांकडील रोख रक्कम पाळत ठेवुन लुटण्याचे प्रमाण वाढले आहे.

रात्रीच्या वेळीच नव्हे तर दिवसा ढवळ्याही घरफोड्या, रस्तालूट, मंगळसूत्र चोर्‍या, पळवून नेऊन होणारी लूटमार, असे गुन्हे सध्या सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाही पोलिस गस्त सुरु करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नगर शहरात काल एकाच दिवशी पाच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरट्यांनी पळ काढल्याच्या घटना घडल्या. यामुळे नगर शहरात महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी चौकाचौकात फलक लावून प्रबोधनाची मोहीम सुरू केली आहे, तर शिवसेनेने पोलीस अधिकाऱ्यांना भेटून या घटनांना आळा घालण्याची मागणी केली आहे.

नगर शहातील उपनगर आणि मध्यवर्ती भागात सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. दुचाकीवरून आलेल्या चोरांनी पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने ओढून नेले. यातील बहुतांश घटना वर्दळीच्या रस्त्यावर घडल्या. सायंकाळी पावणेसहा वाजता गुलमोहर रस्त्यावर पहिली घटना घडली.

त्यानंतर तासाभरात विविध ठिकाणी अशा घटना घडल्या. प्रतिभा प्रशांत त्रिंबके यांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपयांचे गंठण चोरीला गेले. त्या गुलमोहर रोडवरून जात असताना ही घटना घडली. त्यानंतर श्रद्धा सुशिल भंडारी (बुरूडगाव रोड), राजश्री रामसुख मंत्री (मार्केट यार्ड),

शुभांगी कृष्णा गोसावी (बालिकाश्रम रोड) आणि सविता विकास दरवडे (टिळक रोड) यांच्या गळ्यातील दागिने अशाच पद्धतीने चोरीला गेले. शहरातील पोलीस ठाण्यांत यासंबंधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्याने चोरटे सक्रिय झाले आहेत, असे दिसून येते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24