शहरटाकळी परिसरात कांदा काढणीला वेग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी व परिसरात उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे; परंतु, मजुरांचा तुटवडा भासत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ होताना दिसत आहे.

शहरटाकळी दहिगाव-ने हा बागायत पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात अवकाळी पावसामुळे नोव्हेंबर महिन्यात पेरणी व लागवड झालेल्या गहू, हरभरा, कांदा पिकांचे नुकसान झाले होते.

सध्या कांद्याचे भाव कोलमडलेले असतानादेखील उत्पादन खर्च पदरात पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी वातावरण कोरडे व उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांची खळे करण्यासाठी लगभग सुरू आहे.

यावर्षी कांदा लागवडीचा भाव परवडत नसल्याने यंदा शेतकऱ्यांनी कांदा लागवड करण्याऐवजी पेरणीवर भर दिला होता. लागवड व पेरणी केलेला कांदा एकाच वेळी काढणी योग्य झाल्याने कांदा उत्पादकाला मात्र मजुरांकडे चकरा माराव्या लागत आहेत.

गावापासून शेतीपर्यंत कामासाठी जाण्याकरिता मजुरांकडून सर्रास शेतकऱ्यांकडे चारचाकी वाहनाची मागणी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला अधिकच आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे. कांदा काढणी सुरू आहे; परंतू भावाची शाश्वती नाही. शेतातच कांदा पोळी लावून ठेवल्या आहेत.

चालूवर्षी, लागवडीचा खर्च व काढणीचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सरकारने नाफेडमार्फत २५ रुपये किलो प्रमाणे शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावा तसेच निर्यात धोरण खुले करावे, अशी मागणी शेतकरी अंकुश नवले यांनी केली आहे.