Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील आणखी एक शेअर ट्रेडिंग व्यावसायिक पळून गेल्याची घटना घडली असून, या प्रकाराने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
अनेक गुंतवणुकदारांना चुना लावत पूर्व भागातील एका शेअर ट्रेडिंग व्यावसायिकाने बुधवार (दि. १०) रोजी मध्यरात्री पलायन केल्याची घटना घडली होती, ही घटना ताजी असतानाच गुरुवार (दि.११) रोजी पुन्हा घोटण परिसरातील एका गावातील शेअर व्यावसायिकाने गुंतवणूकदारांचे पैसे घऊन धूम ठोकल्याचा प्रकार घडल्याने गुंतवणुकदारांचा जीव टांगणीला लागला आहे.
सदर व्यावसायिकाने दोन तीन महिन्यांपूर्वी शेअर मार्केटिंगचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला दोन महिन्यांचे व्याज गुंतवणूकदारांना देण्यात आले. गुरुवारी तिसऱ्या महिन्याचे व्याज देण्याची बोली असताना त्या अगोदरच या व्यावयिकाने धूम ठोकली.
गुरुवारी सकाळी गुंतवणुकदार आपल्या ठेवींचे व्याज घेण्यासाठी त्या ठिकाणी येत असताना सदर व्यावसायिक पळून गेल्याची माहिती मिळताच त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. गत महिन्यात पाच ते सहा शेअर ट्रेडिंग व्यावसायीक कोट्यवधी रुपये बुडवून पळून गेले,
त्यावेळी गुंतवणूकदारांत खळबळ उडाली. पुन्हा तोच प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने अनेकांवर पश्चताप करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, आजपर्यंत पळून गेलेल्या शेअर व्यावसायिकांनी साधारण शंभर कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकदारांना गंड्डा घातल्याचा संशय व्यक्त होत आहे