Ahmednagar News : काँग्रेसच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संचालक प्रशांत दरेकर यांची तर श्रीगोंदा शहराध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांची निवड करण्यात आली.
नूतन जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी या निवडीचे पत्र दिले. सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र दादा नागवडे आणि त्यांच्या पत्नी सौ. अनुराधा नागवडे यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील काँग्रेस सावरण्याची जबाबदारी सोपवण्याचे आव्हान आ. बाळासाहेब थोरात यांच्यापुढे होते.
तालुक्यात संघटन आणि तालुकाध्यक्ष पदाचा अनुभव असलेल्या प्रशांत दरेकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहराध्यक्ष मनोहर पोटे यांनी २०१६ ते २०१९ या कालावधीत नगराध्यक्ष पदाच्या म्हणून माध्यमातून विकास कामांतून शहराचा चेहरा मोहरा बदलल्याने २०१९ च्या नगरपालिका निवडणुकीत पत्नी सौ. शुभांगी पोटे या जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आल्या.
नूतन तालुकाध्यक्ष दरेकर आणि शहराध्यक्ष पोटे यांनी तालुक्यात पक्षाचा विस्तार करण्याचे ध्येय ठेवले असून, काँग्रेसची ध्येय धोरणे जनमानसात पोहोचवून तालुक्यात संघटन मजबूत करण्याचा मानस व्यक्त केला आहे.