Ahmednagar News : मराठा-कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत मुंबईकडे जाणाऱ्या पायी दिंडीत नगरमध्ये सुमारे २५ लाख मराठा समाज बांधव येणार आहेत. त्यामधील १ लाख बांधवांच्या भोजनाची व्यवस्था श्रीरामपूरकरांनी स्वीकारली आहे.
त्यामुळे अखंड हरिनाम सप्ताह प्रमाणे ग्रामीण भागातील व शहरातील सर्व समाज बांधव यांच्याकडून गहू, हरभरा, गोड़तेल डबे आदी शिधा संकलन केला जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाज व अखंड मराठा समाज संयोजकांनी दिली आहे.
अंतरवाली सराटी येथून जरांगे पाटील पायी मोर्चाने मुंबईकडे रवाना होणार आहेत. पाथर्डी, अहमदनगर येथून पुणे मार्गे मुंबईत लाखो मराठा समाज बांधव जाणार आहे. नगरमध्ये सुमारे २५ लाख बांधव पायी दिंडीने येणार आहेत.
त्यामधील एक लाखापेक्षा जास्त बांधवांची जेवणाची व्यवस्था श्रीरामपूर तालुक्याला देण्यात आली आहे. श्रीरामपूर येथे जरांगे पाटील यांच्या झालेल्या जाहीर सभेची सकल मराठा समाजाच्या ज्या टीमने यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आणि पारदर्शक कारभार करून जनतेला जमा-खर्च सादर केला. त्याच नियोजन समितीकडे पुन्हा नगर मधील अन्नदानाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अहमदनगर येथे झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीस सुरेश कांगुणे, नागेश सावंत, अॅड. गणेश सिनारे, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.
गहु, हरभरा, गोडतेल डबे शिधा देण्याचे आवाहन
श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरात असलेल्या सर्व समाजातील जनतेने तसेच राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, सेवा सोसायटी, पतसंस्था, ग्रामपंचायत, विविध संघटना, व्यापारी, व्यावसायिक आणि दानशूर व्यक्तींनी
या अन्नदानासाठी शिधा स्वरूपात गहू, हरभरा, गोडतेल डबे अथवा इतर वस्तू समितीकडे श्रीरामपूर कार्यालयात (दि.१८) जानेवारी अगोदर जमा करण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.
त्याकरिता श्रीरामपूर येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले असून इतर कोणाकडे वस्तु रूपाने अथवा रोख देणगी देऊ नये, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकात केले आहे.