Ahmednagar News : श्रीरामपूर शहरातील एका पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवीचे पैसे परत मिळत नसल्याने पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आमदार लहू कानडे यांची नुकतीच भेट घेऊन आपली कैफियत मांडली. सदर पतसंस्थेत सुमारे ८० कोटी पेक्षा अधिक रक्कम ठेवीच्या रूपात अडकल्याचे यावेळी ठेवीदारांनी आ. कानडे यांना सांगितले.
सदर पतसंस्थेत २५ हून अधिक ठेवीदारांनी वीस हजार ते अकरा लाख रुपये, अशा रकमेच्या बचत व मुदत ठेवी ठेवल्या आहेत. सहा ते आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही पतसंस्थेकडून मुदत संपलेल्या ठेवींचे पैसे दिले जात नाहीत.
पतसंस्थेचे अध्यक्ष व श्रीरामपूर शाखेचे व्यवस्थापक यांच्याकडे अनेकदा मागणी करूनही ठेवींचे पैसे दिले जात नाहीत. आज देऊ, उद्या देऊ, असे सांगून पतसंस्थेकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
ठेवीदारांनी पै पै करून पैसे जमा केले असून ते पतसंस्थेत ठेवीचे रूपात ठेवले आहेत. सध्या मुलांच्या परीक्षेचा काळ असून ठेवीदारांना पैशाची नितांत आवश्यकता आहे, परंतु पतसंस्थेकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे ठेवीदारांनी आ. कानडे यांना सांगितले.
याबाबत आ. कानडे यांनी, पतसंस्था मल्टीस्टेट असल्याने तसेच व्याजदर चांगला मिळेल, या आशेने या पतसंस्थेत अनेक गरजवंत तसेच गरीब लोकांनी पैसे गुंतविले आहेत. परंतू त्यांना त्यांच्या ठेवींचे पैसे मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.
याबाबत चांगल्या वकिलामार्फत न्यायालयात अथवा पोलिसात फिर्याद दाखल करण्याबाबत सुचविले. याबाबत शुक्रवार दि. २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता यशोधन संपर्क कार्यालयात ठेवीदार व खातेदारांची बैठक घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यात येईल, असेही आ. कानडे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, कार्लस साठे, माजी नगरसेवक अशोक कानडे, सरपंच अशोक भोसले, विष्णुपंत खंडागळे तसेच ठेवीदार विजय बोराडे,
गोरक्षनाथ शेटे, संजय अंबिलवादे, गौरव ओमने, चंद्रकांत गलांडे, प्रशांत बुनगे, भाऊसाहेब उगले, तुषार उगले, निखिल भोसले, राजू जाधव, सुरेश तुरकणे, केशव दुपाटी, राजेंद्र भांबरे, वैशाली बोराडे, मयुरी ओमणे, शारदा गलांडे, वैशाली भोसले, सुवर्णा माळवे आदींसह ठेवीदार उपस्थित होते.