एसटी बस सेवा बंदचा फटाका,कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :-लॉकडाऊन काळात मागील तीन महिन्यापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस सेवा बंद असल्यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्यात आली आहे. तर सध्याच्या परिस्थितीत वेतन मिळणे देखील अवघड झाले असताना कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाहासाठी पुर्ण वेतन मिळण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी बलभीम कुबडे, उमेश साठे, लक्ष्मण बोरुडे, राजू अल्हाट, जालिंदर उल्हारे, निलेश चांदणे, भगवान जगताप आदी उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे एसटी बस सेवा बंद असल्याने कर्मचार्‍यांचे मार्च व एप्रिल महिन्यात 25 टक्के, मे मध्ये 50 टक्के वेतन कपात करण्यात आली. तर जून महिन्याचे वेतन अजूनही मिळालेले नाही.

कर्मचार्‍यांचे वेतन होत नसल्याने त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. मुलांच्या शिक्षणाचा, दवाखान्याचा खर्च त्याचप्रमाणे घरामधील जीवनावश्यक वस्तू घेण्याचा खर्च करणे अवघड झाले आहे. पगार होत नसल्याने कर्मचार्‍यांचे जीवन जगणे फार कठीण झालेले आहे. देशासह महाराष्ट्रात कोरोना महामारीचे संकट भेडसावत आहे.

कोरोनाच्या संकटात सर्वच उद्योगधंदे मोडकळीस आले आहे. तर व्यवसाय मंदीत सुरु आहे. दुसरा कामधंदा मिळणे कठीण झाले आहे. जीवन जगावे कसे? हा प्रश्‍न एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांपुढे उभा राहिला आहे.

या कर्मचार्‍यांनी लॉकडाऊनपुर्वी अनेक वेळा एसटी महामंडळाला नफा मिळवून दिला आहे. त्यांच्यावर कठिण प्रसंग आला असता ते वेतनापासून वंचित राहिले आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक प्रकारचे 52 महामंडळे आहेत. एसटी महामंडळ वगळता अनेक महामंडळ कर्मचार्‍यांचे वेतन वेळेवर होत आहेत.

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा दरमहा पगार देखील इतर महामंडळाच्या तुलनेत कमी असून, सध्या ते देखील मिळणे कठिण झाले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी शपथविधीनंतर परिवहन महामंडळाचे 53 हजार कर्मचार्‍यांचे राज्य शासनात समाविष्ट केले आहे.

त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी एसटी महामंडळ बरखास्त करून सर्व कर्मचार्‍यांना राज्य शासनाच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावे, एसटी महामंडळ कर्मचारी सेवानिवृत्त झाले असता त्यांना अत्यल्प 1 हजार पेन्शन मिळत असून,

त्यांना किमान 9 हजार रुपये पेन्शन मिळावी, परिवहन मंडळाच्या कर्मचार्‍यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन मागील तीन महिन्याचे शिल्लक वेतन त्वरीत देऊन, प्रत्येक महिन्याचे पुर्ण वेतन वेळेवर देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24