अहमदनगर बातम्या

‘एसटी’ कर्मचाऱ्यांनी आंदोलनात देखील जपले सामाजिक दायित्व

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- तारकपूर आगारातील आंदोलनकर्त्या एसटी कामगारांनी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने एसटी कामगारांनी रक्तदान करीत आंदोलनातही सामाजिक उत्तरदायित्व जपले.

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच सामाजिक दायित्वाचे भान जपत रक्तदान केले असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. या शिबिरात ५५ रक्त पिशव्यांचे संकलन झाले. दरम्यान काल २७ व्या दिवशीही एसटी कामगारांच्या आंदोलनाची लढाई एकीकडे सुरूच होती अन त्यामुळे जिल्ह्यात लालपरीला लागलेला ब्रेक देखील कायम होता.

मागण्यांसाठी मागील महिन्यातील २७ ऑक्टोबर रोजी राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या विविध संघटनांच्या संयुक्त कृती समितीने उपोषण आंदोलनाची हाक दिली होती.आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामगारांच्या काही मागण्या मंजूर केल्या.

त्यामुळे संयुक्त कृती समितीच्या पत्रकाद्वारे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा २८ ऑक्‍टोबर रोजी करण्यात आली. दि. ३ नोव्हेंबर रोजी कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्य सरकारी सेवेमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पुन्हा संपाची हाक देण्यात आली.

मागील २३ दिवसापासून पासून एसटी कामगारांचे आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत एसटी कामगारांच्या लढाईत सामील झाले होते.

दरम्यान आंदोलनाची वाढती धग लक्षात घेत मंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाई नंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची घोषणा केली आणि आंदोलन मागे घेण्याचे आवाहन कामगारांना केले.

या घोषणेच्या दुसऱ्या दिवशी खोत व पडळकर यांनी अर्धी लढाई जिंकल्याचे नमूद करीत तसेच कामगारांच्या लढाईस पाठींब्याचे सूतोवाच करीत आंदोलनातून माघार घेतली.

मात्र, त्याच दिवशी एसटी कामगारांची न्यायालयीन बाजू संभाळणारे विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी ‘विलीनीकरणा खेरीज माघार नाही’ अशी घोषणा केली. जिल्ह्यातील एसटी कामगारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आंदोलक एसटी कामगार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट होत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office