Newasa News : पन्नास कोटी रुपयांचे बजेट असलेल्या नेवासा महामार्गाचे काम तातडीने सुरू करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Newasa News : नेवासा फाटा ते नेवासा या महामागांचे बंद पडलेले काम तातडीने सुरू करावे, यासाठी नेवासा काँग्रेसकडून सार्वजनिक बांधकाम विभागास रस्तारोकोसह जलसमाधी आंदोलनाचे निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल पन्नास कोटी रुपयांचे बजेट असलेल्या नेवासा फाटा ते टाकळीभान या महामार्गाचे काम सुरू होवून जवळ जवळ एक वर्ष उलटून गेले. परंतु अद्यापही काम पूर्ण झाले नाही. जवळ जवळ चार महिन्यांपासून काम पूर्ण बंदच झाले आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या कामामुळे तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

तर एस कॉर्नर ते नेवासा बुद्रुक या दरम्यान, अपूर्ण कामामुळे अनेक खड्डे पडले आहेत. यात अनेक अपघात होवून नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागास वेळोवेळी निवेदने देऊन या महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याविषयी उडवाउडवीची उत्तरे दिली.

काल सोमवारी नेवासा तालुका काँग्रेस कमिटीने सार्वजनिक बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता रमेश दुबाळे यांची भेट घेत काम काम बंद का आहे, असा जाब विचारला व सदर काम आठवडा भरात तातडीने सुरू करावे,

अशी मागणी केली. त्वरित काम सुरू न केल्यास या महामार्गा वरील प्रवरानदी पात्रावरिल पुलावर येत्या गुरूवारी रस्ता रोको आंदोलनसह जलसमाधी घेण्याचे निवेदन देण्यात आले.

सदर निवेदन देत्यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे, शहराध्यक्ष अंजुम पटेल, जिल्हा काँग्रेसचे संदीप मोटे, काँग्रेस एससी विभाग अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, सचिन बोर्डे, सतीश तन्हाळ, आलम पिंजारी, इलियास शेख,

संजय होडगर, गोरक्षनाथ काळे, किरण साठे, द्वारक जाधव, महिला काँग्रेसच्या शोभा पातारे, ज्योती भोसले, राणी भोसले, शहर काँग्रेसचे नसरुद्दीन पटेल, अश्फाक शहा, जुबेर शेख, असिफ शेख, मोसिन शेख आदीसह नागरिक उपस्थित होते.

तालुक्यात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालेला दिसून येत असून अधिकारी वर्ग ठेकेदारांना उघड उघड पाठीशी घालत आहेत. या सुरु असलेल्या सर्व कामाची राज्य गुणवत्ता विभागाकडून चौकशी झाली पाहिजे.

ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची लवकरच चौकशीची मागणी करणार आहे. -संभाजी माळवदे, अध्यक्ष, नेवासा तालुका काँग्रेस कमिटी.