अहमदनगर बातम्या

देवगड अश्वस्पर्धेचा राज्यभर लौकिक : आ. थोरात

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : घोडा हा माणसाचा आवडता प्राणी असून इतिहासकालीन लढायांमध्ये घोड्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

देवगड येथे होत असलेल्या अश्व बाजार व प्रदर्शनात देशभरातून मोठ्या संख्येने अश्व दाखल झाले असून या स्पर्धेचा राज्यभरात मोठा लौकिक निर्माण झाला आहे, असे गौरवोद्गार आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

तालुक्यातील देवगड येथे तालुका अश्वप्रेमी असोसिएशन व शिवराज निर्माण संघटनेच्या वतीने आयोजित अश्वस्पर्धा अश्वप्रदर्शन व अश्वबाजार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. सुधीर तांबे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर,

आयोजक रणजीत देशमुख, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, राजेंद्र चकोर, इंद्रजीत थोरात, उत्कर्षा रुपवते, देवस्थानचे अध्यक्ष उत्तम जाधव,

सुभाष गडाख, डॉ. प्रमोद पावसे, डॉ. संदीप पावसे, रफिक फीटर, मकरंद मुळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार थोरात पुढे म्हणाले, देवगड हे संगमनेर तालुक्यातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. ही यात्रा म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. लहानपणी या यात्रेला आम्ही बैलगाडीतून यायचो.

दूध संघाच्या माध्यमातून देवगड परिसरात वृक्षारोपणासह अनेक विकास कामे झाली आहेत. मागील ७ वर्षांपासून होत असलेले प्रदर्शन हे राज्य पातळीवर पोहोचले आहे. देशभरातून अनेक अश्वमालक या ठिकाणी येत असतात.

देखणी जनावरे, घोडे बाळगणे हा नाद असावा लागतो. शेतकऱ्यांना या जनावरांचे मोठे प्रेम असते. घोडे बाळगणे म्हणजे खर्च ज्यादा असतो. ही हौस असते. अगदी इतिहासात व शिवकाळात घोड्यांचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे.

याप्रसंगी सत्यशील शेरकर, रणजित देशमुख, डॉ. तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध संस्थांचे अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी अश्व प्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजित देशमुख यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. प्रमोद पवसे यांनी आभार मानले.

अश्वांच्या अनोख्या नृत्याची रंगत

या अश्वप्रदर्शनात ३२१ अश्वांचा सहभाग करण्यात आला. यामध्ये अनेक अश्वांनी दोन पायावरील, चार पायावरील नृत्य व कसरती सादर केल्या. पारंपारिक वाद्यावर बुलेट वरील डान्स, उंचउडी, असे विविध नृत्य सादर केले.

अश्वांचा रुबाबदारपणा त्यांची राईड आणि त्यांचे नृत्य डोळ्याची पारणे फेडणारी ठरले. महाराष्ट्रातील सर्वात उंच घोडा या अश्व प्रदर्शनात सहभागी झाला होता. त्याचा रुबाबदारपणा, त्याची चाल, हे या स्पर्धेतील मुख्य आकर्षण ठरले.

Ahmednagarlive24 Office