शहरातील गाळे पाडण्याऐवजी त्यांच्याकडून तीनपट कर वसुली करुन महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढवा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- शहरात खासगी जागेत उभारण्यात आलेल्या विनापरवाना पत्र्यांच्या गाळे पाडण्याऐवजी त्यांच्यावर तीनपट कर वसुलीची दंडात्मक कारवाई करुन महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे निर्भय नवजीवन फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप भांबरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

गाळे पाडून गोरगरीबांचे नुकसान करण्यापेक्षा त्यांच्याकडून कराच्या रुपाने दंड वसूल करुन सदर गाळे नियमाकुल केल्यास दरवर्षी महापालिकेला उत्पन्न मिळणार असल्याचे भांबरकर यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका प्रशासनाने खासगी जागेत विनापरवाना उभारण्यात आलेले पत्र्याचे गाळे पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेने खासगी जागे ऐवजी रस्त्यांवर झालेले अतिक्रमण काढण्याची गरज आहे. अहमदनगर महापालिका ही आर्थिक दृष्ट्या कमकुवत असताना आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याची गरज आहे.

महापालिकेने शहरातील खासगी जागेत विनापरवाना उभारण्यात आलेले पत्र्याचे गाळे पाडण्याचा घेतलेला निर्णय अडाणीपणाचे लक्षण असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

खासगी जागेत पत्र्याचे गाळे उभारले असताना अतिक्रमण झाले नसून, फक्त परवानगी घेण्यात आलेली नाही. महापालिकेने प्रत्येक व्यावसायिक गाळ्यावर नियमित कराच्या तीनपट कर रुपाने दंडात्मक कारवाई केल्यास महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे.

तर हे गाळेधारक वर्षाला नियमित कर देखील भरतील. सदर गाळे पाडले तर गोर-गरीब व्यावसायिकांचे व साधन संपत्तीचे मोठे नुकसान होणार आहे.

तरी महापालिका प्रशासनाने विनापरवाना पत्र्यांच्या गाळे पाडण्याऐवजी त्यांच्यावर तीनपट कर वसुलीची दंडात्मक कारवाई करुन त्यांना नियमाकुल करण्याची मागणी निर्भय नवजीवन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.