अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-नेवासा तालुक्यातील नगर- औरंगाबाद महामार्ग ते कल्पवृक्ष, सावतानगर, त्रिवेणीनगर या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते; परंतु हे काम अपूर्ण अवस्थेत आहे.
हा रस्ता परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून तो त्वरित पूर्ण करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने नेवासा तालुक्याचे गट विकास अधिकारी शेखर शेलार यांना निवेदन दिले.
दरम्यान शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्ता अपूर्ण राहिल्याने सद्यस्थितीत येथील नागरीकांना येण्या- जाण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याने दुचाकी वाहन चालवणे सुद्धा जिकरीचे झाले आहे. वयोवृद्ध नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. या रस्त्यावर गेल्या महिन्यात दोन गंभीर अपघात झाले आहेत.
याची दखल घेत रस्त्याचे उर्वरित काम तत्काळ होणे गरजेचे असल्याने ते पूर्ण करण्यात यावे, अन्यथा परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल,
याची दखल पंचायत समिती प्रशासनाने घ्यावी, असे शिवसेनेच्या वतीने गटविकास अधिकारी शेखर शेलार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.